आदिवासी गावांमध्ये तत्काळ मिळणार मुलभूत सुविधा

0

रावेर । आदिवासी गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी गावकर्‍यांनी मागणी केल्यास त्याची त्वरित दखल घेऊन सुविधा पुरवण्यात येतील. यामध्ये शिक्षण, रस्ते, गटारी, पाणीपुरवठा यासह इतर योजना आदिवासींपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आदिवासी प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी केले. पाल येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

सहा गावांच्या विकासासंदर्भात बैठक
पाल येथील दादासाहेब चौधरी प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेंतर्गत यावल, रावेर तालुक्यातील आदिवासी भागातील सहा गावांचा सर्वांगीण विकाससंदर्भात जिल्ह्यातील विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी अधिकार्‍यांनी आपापल्या विभागाच्या योजनांची माहिती आदिवासी बांधवाना दिली.

सहा गावांना दीड कोटींचा निधी
यावल तालुक्यातील गाडर्‍या, जामन्या, उसमळी, लंगडा आंबा तर रावेर तालुक्यातील गारबर्डी, गारखेड़ा, येथे दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून गावाच्या सर्वांगीण विकासावर हा निधी खर्च करण्यात येणार आहे. यावेळी गांडूळ खत निर्मिती, विहिर दुरुस्ती, आदिवासी मुलांच्या योजना, बाल कल्याणची माहिती, बचत गटाचे फायदे, पशू संवर्धकाचे फायदे कौशल्य विकासचे फायदे, आदिवासी बांधवाना यावेळी सांगण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी लोकसंघर्ष समितीच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, प्रांताधिकारी डॉ.अभिजीत थोरबोले, वनसंवरक्षक वन्यजीव एन.आर. प्रबीन, उपमुख्यधिकारी आर.आर. तड़वी, कौशल्य विकासच्या डॉ. अनुपमा पाटील, जिल्हा पशुसंवर्धक पी.एस. इंगळे, वनक्षेत्रपाल पी.बी. सोनवणे, वनक्षेत्रपाल यू.एम. पाटील यांसह पंचायत समीती, कृषि विभाग, आत्मा विभाग, आदिवासी विभाग, महसूल, वन, वन्यजीव, सामाजिक वनीकरण, पशु वैद्यकीय विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्राचे रावेर, यावल, जळगाव येथून अधिकार्‍यांची उपस्थिती होती.