तळोदा । आदिवासी विकास विभागांतर्गत घेण्यात येणार्या सन 2017-18चा राज्यस्तरीय स्पर्धेत तळोदा आदिवासी प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांनी गौरवास्पद कामगिरी करत घवघवीत यश मिळविले आहे. वास्तविक तळोदा प्रकल्पाअंर्तगत येणार्या आश्रमशाळा अतिशय दुर्गम भागात विखुरलेल्या असतांना, खेळाडूंची ही कामगिरी नक्कीच नेत्रदीपक व कौतुकास्पद आहे. आदिवासी विकास विभागाचा शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मोहिली अघई इथे संपन्न झाल्या.
यांनी केले मार्गदर्शन
यशस्वी सर्व खेळाडूंचे व त्यांचा मार्गदर्शकांचे तळोदयाचे प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा, शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रकल्पाधिकारी संजय चौधरी, शैलेश पटेल, अशोक तांबोळी, विनोद पटेल, शिक्षणविस्तार अधिकारी एन.डी. ढोले, मराठे मॅडम आणि प्रकल्पाअंतर्गत येणारे सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी खेळाडूंना प्रकल्पाचे क्रीडा विभागाचे शरद सूर्यवंशी, गणेश दाभाडे, डी.एन.मोरे व संबंधित शाळेच्या क्रीडा शिक्षकांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.
14, 17, 19 वयोगटात झाल्या स्पर्धा
या राज्यस्तरीय स्पर्धेत तळोदा आदिवासी प्रकल्पाच्या खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत कबड्डीचा 17 वर्षे या वयोगटातील मुलांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. वैयक्तिक क्रीडा प्रकारात 14 वर्षे वयोगटातील 600 मीटर धावण्याच्या स्पर्धेत दीपक भरतसिंग वळवी या विद्यार्थ्याने कास्यपदक पटकाविले आहे, 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत जेवंता मालसिंग वसावे या विद्यार्थिनींने कास्यपदक पटकाविले आहे. तसेच 17 वर्षे वयोगटातील 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सामसिंग इरमा वसावे या विद्यार्थ्याने रौप्यपदक पटकाविले आहे. त्याचप्रमाणे 19 वर्षे वयोगटातील भालाफेक प्रकारात राजेंद्र रायसिंग नाईक या विद्यार्थ्याने सुवर्णपदक प्राप्त केले आहे.