यावल- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आदिवासी विभागातील विविध प्रकारच्या समस्यांसंदर्भात यावल प्रकल्पाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. शासन निर्णयानुसार आदिवासी वसतिगृहातील खानावळ बंद करून भत्ता विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होईल, असा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी सोयीचा नसून यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्या उद्भवणार आहेत. शासकीय यंत्रणा व त्यातील त्रृटींमुळे लाभार्थ्यांना योजनांचा पैसा वेळेत कधीच मिळत नाही हा आजवरचा अनुभव आहे तयामुळे भोजन वस्तीगृहीतील मेसमध्ये मिळावे व त्याचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली.
अशा आहेत मागण्या
वसतीगृहात पूर्ण वेळ गृहपाल व सुरक्षारक्षक नेमावे व असुविधांना कारणीभूत अधिकार्यांवर कारवाई करावी, आदिवासी विभागातील थकीत शिष्यवृत्ती विद्यार्थांच्या खात्यावर वर्ग करावी यासह विविध मागण्यासंदर्भात सहाय्यक प्रकल्प अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात अन्यथा अ.भा.वि.प. तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. या शिष्टमंडळात जिल्हा संयोजक प्रमोद सोनवणे, तालुकाप्रमुख प्रवीण बडगुजर, शहरमंत्री – जतीन बारसे, सहशहरमंत्री अनिकेत सोरटे, कोशप्रमुख तेजस भोईते, तालुकासंपर्क प्रमुख यशवंत सोनार व कार्यकर्ते सागर मोरे, विशाल पाटील, समीर तडवी, जाकिर तडवी, संदीप चौधरी व विद्यार्थी उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख तुषार वारुळकर कळवतात.