दिलीप वळसेपाटील यांचा सभागृहात औचित्याचा मुद्दा
नागपूर – लोकशाहीमध्ये आपल्या मागण्या मांडण्यासाठी पदयात्रा काढणं किंवा वृत्तपत्रांनी वृत्तसंकलन करणं आणि ते लोकांपर्यंत पोचवणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करुन धक्काबुक्की केली,कॅमेरा तोडला त्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसेपाटील यांनी औचित्याच्या मुदयाद्वारे सभागृहात केली.त्यानंतर ते मिडियाशी बोलत होते.
राज्यातील आदीवासी शासकीय वसतीगृहामध्ये राहणाऱ्या आणि शिकणाऱ्या विदयार्थ्यांचे वसतीगृहातील जेवण बंद करुन सरकारने त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे आज राज्यातील आदिवासी विदयार्थ्यांची उपासमार होत असल्याने आदिवासी विदयार्थ्यांनी पुण्यापासून ते नाशिकपर्यंत शांततेने पदयात्रा काढून आपल्या मागण्या आदिवासी कल्याण आयुक्तांपर्यंत पोचवण्यासंदर्भात नियोजन केले होते असेही दिलीप वळसेपाटील म्हणाले.
पुण्यापासून सिन्नरपर्यंत हा मोर्चा अगदी शांततेत सुरु होता परंतु नांदूरला अचानक सिन्नर तालुक्यामध्ये ४०० विदयार्थ्यांना ६०० पोलिसांनी घेराव घातला आणि त्याठिकाणी त्यांना थांबवण्यात आले आणि त्यांना पोलिस गाडयांमध्ये टाकून पुण्याला हेडक्वार्टरला नेण्यात आले. त्या मोर्चाचे चित्रिकरण करायला गेलेल्या टिव्ही चॅनेल, वृत्तपत्र प्रतिनिधींना धक्काबुक्की करण्यात आली याचा आमदार दिलीप वळसेपाटील यांनी निषेध केला.
यासंदर्भातील प्रश्न आमदार दिलीप वळसेपाटील यांनी विधानसभेत मांडला आणि यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, निव्वळ याच प्रश्नासाठीच नाही तर आदिवासी समाजाच्या सर्वच प्रश्नासाठी बैठक बोलवावी आणि या सगळया प्रश्नाची चर्चा करावी. मुख्यमंत्र्यांनी ही बाब मान्य केली आहे. लवकरच बैठक घेवून विदयार्थ्यांवरील अन्याय दुर करु असे त्यांनी सांगितल्याचे आमदार दिलीप वळसेपाटील यांनी मिडियाशी बोलताना सांगितले.
या राज्यात आदिवासी मुलांचे शिक्षण सतत चालू रहावं याच्यासाठी बंद केलेल्या शाळा किंवा बंद केलेल्या आश्रमशाळा सुरु झाल्या पाहिजेत. विदयार्थ्यांचे वसतीगृहातील जेवण सुरु झाले पाहिजे त्यांची उपासमार टळली पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सरकारने विदयार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणीही आमदार दिलीप वळसेपाटील यांनी केली.