आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी वर्गास सुरुवात

0

यावल । आदिवासी विद्यार्थ्यांनी शैक्षणिकदृष्ट्या प्रगत व्हावे, यासाठी इयत्ता दहावीत प्रवेशित सर्व 15 शासकीय माध्यमिक आश्रमशाळांमधील 357 विद्यार्थ्यांसाठी त्या-त्या शाळेत उन्हाळी शिकवणी वर्ग सुरु करण्यात आले. दरवर्षी सर्व विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी एकत्रित करून हा उपक्रम राबवला जायचा. यंदा मात्र तीव्र तापमानामुळे हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबवला जात आहे. यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांर्तगत जिल्हाभरात 15 शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा आहेत.

357 विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी वर्ग सुरू
या शाळांमध्ये इयत्ता 9वी उत्तीर्ण होऊन दहावीत प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या 357 आहे. शैक्षणिक जीवनातील दहावीचे वर्ष अतिशय महत्वाचे असल्याने गोरगरीबांच्या या मुलांनी कुठेही मागे राहू नये यासाठी प्रकल्पाने दहावीतील या 357 विद्यार्थ्यांसाठी 16 एप्रिलपासून उन्हाळी वर्ग सुरू केले आहेत. 30 एप्रिलपर्यंत हे वर्ग चालतील. त्यात इंग्रजी, गणित, मराठी विज्ञान विषयाचे तज्ज्ञ शिक्षक ज्ञानदान करत आहेत. दरम्यान, चार वर्षांपूर्वी राज्यातील केवळ यावल प्रकल्पात हा प्रयोग राबवण्यात आला होता. परिणामी अनेक शाळांचा दहावीचा निकाल 100 टक्के लागत आहे. यंदा प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी महिनाभराच्या वर्गाचे नियोजन केले असून पाच शिक्षण विस्तार अधिकार्‍यांकडे जबाबदारी आहे. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना शहरी भागाच्या तोडीस तोड शिक्षण मिळावे यासाठी काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या वर्षात शासकीय आश्रमशाळांचा इयत्ता 10 वीचा निकाल 100 टक्के लागावा यादृष्टीने मेहनत घेतली जात आहे. प्रत्येक शासकीय आश्रमशाळेत इयत्ता दहावीमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना सकाळी 7.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत विविध विषयाचे तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला जातो. यापूर्वी हा उपक्रम दोन शाळांमधील विद्यार्थी एकत्र करून राबवला जात होता.