जळगाव। आधार सक्तीचे करण्यात आल्याने आधार नोंदणी करणे गरजेचे झाले आहे. जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांची मोठ्या प्रमाणात आधार नोंदणी बाकी असल्याने शासनाने आधार नोंदणीचे काम अंगणवाडी पर्यवेक्षीकांच्या माध्यमातून करण्याचे आदेश दिले आहे. मात्र अंगणवाडी पर्यवेक्षीकांवर पोषण आहार पुरविण्यासोबतच अंगणवाडी संबंधी इतर कामाची जबाबदारी असल्याने त्यांनी आधार नोंदणीचे काम करण्यास विरोध दर्शविला आहे. शुक्रवारी 23 रोजी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात जिल्ह्याभरातील अंगववाडी पर्यवेक्षीकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. आधार नोंदणी संबंधी माहिती देण्यासाठी ही बैठकीचे आयोजित करण्यात आली होती.
कुपोषण कमी करण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाची अंमलबजावणीची मोठी जबाबदारी आमच्यावर असतांना इतर कामे करणे आम्हाला शक्य होत नसून अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे पर्यवेक्षीकांनी यावेळी अधिकार्यांना सांगितली. ’आज शासन आम्हाला आधार नोंदणीचे काम देत आहे, उद्या अस्वच्छता पसरल्यास स्वच्छता करण्याची जबाबदारी देखील आमच्यावर देतील, आम्ही हेच कामे करत रहावे का?, आणखी अंगणवाडीच्या कामकाजात दुर्लक्ष झाल्यास आम्हालाच जबाबदार धरले जात असल्याची व्यथा अंगणवाडी पर्यवेक्षीकांनी यावेळी मांडली.’ अंगणवाडी कर्मचार्यांकडून कमी पगारात अधिक काम करुन घेतले जात असल्याने त्यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली.