नेरुळ । वारली पाडा पावणे येथील आदिवासी यांनी शुक्रवारी अतिक्रमण विभागातील कारवाई करायला आलेल्या नवीमुंबई मनपा प्रशासनाला विरोध केला. तसेच आम्हीदेखील स्थानिक प्रकल्पग्रस्त आदिवासी आहोत उपरे नाहीत. त्यामुळे कारवाई अगोदर आमचे पुनर्वसन करावे, असे सुनावले. मनपाने 1995 साली केलेल्या सर्वेक्षणानुसार 142 गावकर्यांचे आधी पुनर्वसन करा मगच आमच्या गावावर कारवाई करा. नाहीतर आम्ही सर्व आदिवासी लोकशाही मार्गाने राज्य सरकार व मनपाच्या कारवाई दरम्यान काळे झेंडे दाखवून निषेध करू तसेच या अन्यायाविरोधात आझाद मैदान येथे राज्य सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा काढला जाईल, असा इशारा वारलीपाडा गाव बचाव कृती समितीचे अध्यक्ष कृष्णा वड यांनी दिली.
आदिवासींच्या अनेक पिढ्या या गावात मोठ्या झालेल्या आहेत. नवी मुंबई मनपा ने 2001 मध्ये आदिवासींच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन गावाचे सर्वेक्षण झोपडपट्टी म्हणून केले. याबाबत हे अदिवासी न्यायालयात दाद मागणार आहेत. 2003 दरम्यान मनपाने वाल्मिकी घरकुल योजनेअंतर्गत दिलेली घरे गावकर्यांनी नाकारली आहेत. त्यामुळे गावाचे मनपाने पाणी, वीज, रस्ता, साफसफाई तसेच सुलभ शौचालय अशा मूलभूत सुविधादेखील मागील अनेक वर्षांपासून मनपा प्रशासनाने जाणूनबुजून बंद केल्या आहेत, असा आरोप हे आदिवासी करत आहेत.
आम्ही मनपाला विनंती केली आहे, की ज्यांना घरे दिली आहेत, ते लगेच तेथे राहण्यास जातील. मात्र, वारलीपाड्यातील उरलेल्या आदिवासी कुटुंबीयांचे व गावकर्यांचे सर्वेक्षण करा, त्यांचे पुनर्वसन करा मगच गावावर कारवाई करा.
– तुळशीराम चौधरी,
पीडित आदिवासी वारलीपाडा