तळोदा (किरण पाटील) । एकेकाळी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची वाट विद्यार्थी आतुरतेने पाहत असत. सुट्ट्या लागल्या म्हणजे भाचेमंडळी मामाच्या गावाला जाण्यासाठी उत्सूक असायची. गावी जाण्याअगोदर त्यांचे मामाकडे कोण कोणते खेळ खेळायचे, याचे नियोजन असायचे. काही मुले तर साहित्यदेखील सोबत नेत. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. मुले मैदानी खेळांऐवजी घरातच टिव्ही, संगणक किंवा मोबाईलमध्ये गेम खेळतात. मैदानी खेळ खेळल्याने मुलांचा शारीरिक विकास झपाट्याने होतो. परंतु, मैदानी खेळ खेळले जात नसल्याने मुलांच्या शारीरिक विकासात अडसर निर्माण झाला आहे.
मोबाईलचा सर्रास दुरुपयोग
मोबाईल हा खर्या अर्थाने गरजेचा असला तरी त्याचा सदुपयोग होण्याऐवजी दुरुपयोगच अधिक होत आहे. स्मार्टफोनमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून डाऊनलोड होणार्या विविध गेम्सद्वारे मनोरंजन होते. अनेक गेम्स हे वाईट आहेत. त्यात ऑनलाईन पद्धतीने खेळला जाणारा जुगार असो किंवा ब्लू व्हेलसारखा धोकादायक गेम असो. त्यामुळे मुले चुकीच्या मार्गाला जात आहेत. याचाही विचार होणे गरजेचे आहे. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवरून मित्रांना ऑनलाईन बोलावून मध्यरात्रीपर्यंत खेळल्या जाणार्या अनेक खेळ खेळण्यात मुले आघाडीवर आहेत.
मुले विसरली मैदानी खेळ
आज विद्यार्थीवर्ग मैदानी खेळ खेळण्याऐवजी स्मार्टफोन म्हणजे मोबाईलमध्येच गेम खेळण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मर्दानी खेळ मानले जाणारे कबड्डी, खो-खो, लंगडी लंगडी, बित्तू बित्तू, तार-कंगणी, टायर-टायर, आबा-धाबी, असे अनेक खेळ लोप पावत चालले आहेत. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रत्येक गल्लीबोळात भरदुपारी मुलांची आरडाओरड चालत असे. आता मात्र, मुले घराबाहेर पडतच नाहीत. विज्ञानाच्या प्रगतीने अनेक संसाधने उपलब्ध झाली खरी; परंतु, मुले मैदानी खेळच विसरले आहेत.
मुलांना टिव्ही, स्मार्टफोनचे वेड
आज लहान मुलांना टिव्ही आणि स्मार्टफोन याचे वेड लागले आहे. मुले तासन्तास मोबाईलवर गेम खेळतात. टिव्ही पाहण्यातदेखील खूप वेळ वाया घालवतात. त्यामुळे मुलांच्या शारीरिक क्षमतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. मैदानी खेळांमुळे मुलांची शारीरिक क्षमता वाढून ते चुणचुणीत होतात. शिवाय त्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकासही झपाट्याने होतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना टिव्ही आणि मोबाईलमध्ये न गुंतू देता त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.