आध्यात्म आणि सुरक्षा व्यवस्था एकत्र आल्यास भारत सदृढ होईल -सहाय्यक पोलीस आयुक्त बर्गे

0
समाधी सोहळ्याच्या नवव्या दिवशी संस्कृती संवर्धन व विकास महासंघाने सामुदायिक अथर्वशीर्ष पठण
पिंपरी चिंचवड : अध्यात्माचे शास्त्र आणि सुरक्षा व्यवस्थेतील शस्त्र या दोन गोष्टी एकत्र आल्या, तर भारत देशाची खर्‍या अर्थाने प्रगती होईल. अध्यात्माच्या माध्यमातून होणारी वेदवंदना आणि सुरक्षा व्यवस्थेकडून होणारी राष्ट्रवंदना एकत्र यायला हवी. त्यातून विकासाचा मार्ग आपल्याला सापडणार आहे, असे मत दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केले. श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यात बर्गे बोलत होते. मंगळवारी समाधी सोहळ्याच्या नवव्या दिवशी संस्कृती संवर्धन व विकास महासंघाने सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केले. त्यानंतर श्रीमोरया गोसावी चरित्र पठण करण्यात आले.
सुुगम संगीताचा कार्यक्रम…
यामध्ये स्थानिक महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांनी सभाग घेतला. सकाळी सामुदायिक महाभिषेक करण्यात आला. याचे संयोजन गजानन चिंचवडे आणि अश्‍विनी चिंचवडे यांनी केले. वल्लभ मुंडले गुरुजी, वेदपाठशाळा, तंडोली व चिंचवड ब्रह्मवृंदाने ब्रह्मणस्पती सूक्त मंडल केले. सिद्धकला भजनी मंडळ-कलावती माता यांनी भजनसेवा केली. रात्री रघुनंदन पणशीकर आणि सहकलाकारांनी अभंग, भक्तिगीते व नाट्यपदांचा सुगम संगीताचा कार्यक्रम सादर केला. दिवसभर रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये 150 जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उदघाटन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, अश्‍विनी चिंचवडे, माजी महापौर अनिता फरांदे, विश्‍वस्त विश्राम देव आदी उपस्थित होते. शिबिराचे संयोजन राजू शिवतरे यांनी केले. कार्पोरेशन ब्लड बँक आणि ओम ब्लड बँक यांनी रक्तसंकलन केले.
पालकांच्या स्वातंत्र्याचा स्वैराचार…
भानुप्रताप बर्गे म्हणाले, स्वातंत्र्यकाळात तरुणांच्या मनात जी राष्ट्रभक्ती होती, ती राष्ट्रभक्ती आजच्या तरुणाईमध्ये दिसत नाही. इंटरनेट आणि सोशल मीडिया आल्यामुळे त्याच्या आहारी आजची तरुण पिढी गेली आहे. भारताचे शत्रू देश भारतीय तरुणांना भडकावून जगातील अन्य देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे. घरातील कलहापासून ते आंतरराष्ट्रीय विघातक घटनांपर्यंत सोशल मीडिया जबाबदार आहे. आज पालकांनी मुलांना स्वातंत्र्य दिले, पण मुलांनी त्याचा स्वैराचार केला आहे. यात पालक आणि मुले दोघांचा दोष आहे. तो दोष आपले आपण दूर करावा.
भारतीयांकडे संस्कारांची कमतरता नाही. संस्कारांची फार मोठी शिदोरी भारतीयांना मिळाली आहे. पण आज दिशा दाखवणारे कमी झाले आहेत. चांगले मार्गदर्शक पुढे यायला हवे. आजच्या शिक्षण पद्धतीत बदल करायला हवा. ज्या शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग होईल, असे शिक्षण द्यायला हवे. लहानपणापासून राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रसंरक्षण याचे शिक्षण द्यायला हवे. जात, धर्म याच्या पलीकडे जाऊन एक देश म्हणून आपण राष्ट्रीय पातळीवर संघटित व्हायला हवं. त्यासाठी व्यक्ती से व्यक्ती, व्यक्ती से समाज आणि समाज से राष्ट्र ही संकल्पना समाजात राबवायला पाहिजे, असेही बर्गे म्हणाले.