आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात

0

चिंचवड : ज्येष्ठ नागरिक हे या वयातही तरुणांना लाजवतील अशा उत्साहात सामाजिक कार्य करतात. ही बाब निश्‍चितच भूषणावह आहे. तरीदेखील महानगरपालिकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी तरतूद करून मंजूर केलेला निधी पूर्णपणे वापरला जात नाही. याबाबत जागरूकता दाखवून निधीचा योग्य विनियोग करावा, असे आवाहन माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे यांनी व्यक्त केले.

तरूणपिढीला शिदोरी द्यावी!
चिंचवड आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आनंद ज्येष्ठ नागरिक संघाला स्वतःची वास्तू मिळाली. तसेच त्याची अधिकृत शासकीय नोंदणी झाली. याबद्दल गोलांडे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उद्योजक स्वानंद राजपाठक, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर खेडकर उपस्थित होते. उद्योजक स्वानंद राजपाठक यांनी, अध्यात्माबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवाची शिदोरी तरुण पिढीला द्यावी; कारण त्या ज्ञानाचा उपयोग अनेक विधायक कामांसाठी होऊ शकतो! असे विचार मांडले.

रवींद्र कुलकर्णी यांनी अहवालवाचन केले. आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर खेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आशा कुलकर्णी, शालिनी कुलकर्णी आणि रवींद्र कुलकर्णी यांनी भक्तिरचना सादर केल्या. विजय राजपाठक, सच्चिदानंद दिवेकर, कविता कोल्हापुरे, दत्तात्रय पुजार यांनी संयोजनात सहकार्य केले. अशोक कपोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.