केजरीवालांनी कुमार विश्वास यांचा पत्ता कापला
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाकडून राज्यसभेवर पाठविल्या जाणार्या तीन उमेदवारांची नावे पक्षाने अगदी शेवटच्याक्षणी जाहीर केली आहेत. मात्र, आपचे जेष्ठनेते आणि सुरुवातीपासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत असणारे कुमार विश्वास यांचे नाव या यादीतून वगळल्याने ते नाराज झाले आहेत. आपकडून कुमार विश्वास यांना राज्यसभेवर पाठवण्यात येईल, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. मात्र पक्षाकडून विश्वास यांना धक्का देत संजय सिंह, नवीन गुप्ता आणि सुशील गुप्ता या तिघांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, विश्वास यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून मी पक्षासाठी कार्य करत आलो आहे. ‘आप’ला दिल्लीत सत्ता मिळून देण्यासाठीदेखील माझे योगदान आहे. तरीही पक्षाने मला डावलले हेच माझ्या कामाचे मला मिळालेले फळ आहे का? असा सवाल कुमार विश्वास यांनी उपस्थित केला.
केजरीवालांच्या बैठकीत झाला निर्णय
राज्यसभेच्या तीन जागांसाठी उमेदवार ठरविण्याचा बुधवारी अंतिम दिवस होता. त्यानुसार आपच्या आठ सदस्यांच्या समितीने संजय सिंह, नवीन गुप्ता आणि सुशील गुप्ता या तीन नावांवर शिक्कामोर्तब केले. पक्षाचे संयोजक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे दोघेही दिल्लीबाहेर होते. त्यामुळे समितीला कोणताच निर्णय घेता आला नव्हता. हे दोन्ही नेते दिल्लीत आल्याने बुधवारी केजरीवाल यांच्या घरी झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
कुमार विश्वास यांचा बंडाचा झेंडा
प्रत्येक वेळेस मी खरे बोललो. विविध प्रश्नांवर सातत्याने बोलत होतोे, त्याचेच मला हे फळ मिळाल्याचे सांगत, कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. ज्यांचा चळवळीशी काहीही संबंध नव्हता, त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येत आहे. गेल्या 12 वर्षांपासून चळवळीत घाम गाळणार्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पदापासून दूर ठेवले जात आहे. आम्ही पक्ष वाढवला त्याचेच हे फळ असल्याचा टोलाही कुमार विश्वास यांनी लगावला. दरम्यान, शेवटच्याक्षणी राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावाचा खुलासा करण्याचा निर्णय आपने घेतला आहे. येत्या 5 जानेवारीरोजी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.