समाजाला समृद्धीकडे, विवेकाकडे, आनंदी समाज निर्माण करण्याकडे घेऊन जाणारा आपला एक स्वतंत्र कार्यक्रम आहे हे लक्षात घेऊन त्यावर काम केले पाहिजे. आज सोशल मीडियाने आपले विश्व व्यापले आहे. जे येईल ते न वाचता फॉरवर्ड करण्याचा जमाना आहे. अशा वेळी आपण जो विचार मानतो तो विचार, तो कार्यक्रम अधिक ताकदीने आणि अधिक जबाबदारीने पुढे नेता आला पाहिजे. कारण लोक सातत्याला आणि सामर्थ्याला सलाम करत असतात. लोकांच्या सुखदुःखाशी जोडून घेता येईल, असे कार्यक्रम आपल्याला देता आले पाहिजे आणि त्या कार्यक्रमावर चिकाटीने काम करता आले पाहिजे.
खूप वर्षे झाली या घटनेला. वसईत दोन दिवसांचे कार्यकर्ता शिबिर सुरू होते. शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी चळवळीतील ज्येेष्ठ आणि मान्यवर मंडळी होती. तरुणांची संख्याही लक्षणीय होती. रात्रीच्या जेवणानंतर कार्यकर्ते एकत्र आले होते. तिथे एका ज्येेष्ठ कार्यकर्त्याने सानेगुरुजी यांच्या भारतीय संस्कृती या पुस्तकातील काही भाग वाचून दाखवण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुसर्या कार्यकर्त्याने त्यावेळी प्रतिगामी विचारधारा असणार्या एका संघटनेचे पत्रक वाचावयास सुरुवात केली. वाचन पूर्ण झाल्यावर आता हे पत्रक आणि भारतीय संस्कृती यावर आपण चर्चा सुरू करू या, असे त्या कार्यकर्त्याने सांगितल्यावर दोन तीन उत्साही पुरोगामी कार्यकर्ते बोलायला उठले. त्यांचे बोलून झाल्यावर मी चिडून बोलायला उभा राहिलो आणि म्हणालो, आपण हे काय चालवले आहे. भारतीय संस्कृती या पुस्तकावर चर्चा आपण करतोय इथपर्यंत ठीक आहे. पण नथुरामी विचारांच्या पत्रकाचे वाचन आणि त्यावर चर्चा? आपल्यापैकी यापूर्वी कुणीही ते पत्रक पाहिले नाही, वाचले नाही.
शिबिरात आलेल्या नवीन कार्यकर्त्यांना नथुरामी विचार रात्री 12 वाजता वाचून दाखवण्याचा आणि त्यावर चर्चा करण्याचा या शिबिराचा उद्देश काय? त्या प्रतिगामी मंडळींना हेच हवे आहे की, त्यांच्या विचारांची, त्यांच्या कार्यक्रमाची जाहीर चर्चा व्हावी आणि त्यांच्या या ट्रॅपमध्ये आपण कळत नकळत अडकत चाललो आहोत आणि आपण त्यांचे प्रचारक कधी बनतो आहोत हेच आपल्याला कळत नाही? ही घटना सांगण्याचे कारण एवढंच की, आपण केवळ आता प्रतिक्रिया वादी झालेलो आहोत का? ज्या विचारांचे ज्या संघटनेचे मी काम करतो तो विचार तो अजेंडा मी लोकांपर्यंत पूर्ण ताकदीने पोहोचवतो का? वर दिलेले उदाहरण खूप वर्षांपूर्वीचे आहे तेव्हा सोशल मीडिया नव्हता. परंतु, आजही त्यात काही बदल झाला आहे असे दिसत नाही. आज सोशल मीडियाने आपले विश्व व्यापले आहे. जे येईल ते न वाचता फॉरवर्ड करण्याचा जमाना आहे. अशा वेळी आपण जो विचार मानतो तो विचार, तो कार्यक्रम अधिक ताकदीने आणि अधिक जबाबदारीने पुढे नेता आला पाहिजे.पण होतं काय प्रतिगामी विचारांची आपणच चर्चा करत बसतो. मग पुन्हा एकदा प्रश्न पडतो की, आपण कुणाचे प्रचारक आहोत? नेमकं काय करायचं आहे, याचं आपलं भान सुटलं का? विरोधासाठी विरोध, की नुसतीच प्रतिक्रिया, की अडजस्टमेंट, की निवडणुकीपुरती बार्गेनिंग, की राजकीय दबाव गट, की राजकीय पर्याय. नेमकं काय करायचं हे ठरवून किमान 5 ते 10 वर्षांचा रोडमॅप तयार केला पाहिजे आणि त्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी शॉर्टटर्म आणि लाँगटर्म कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे. प्रतिगामी शक्ती आहेत म्हणून आपण काम करत नसून पुरोगामी म्हणून समाजाला समृद्धीकडे, विवेकाकडे, आनंदी समाज निर्माण करण्याकडे घेऊन जाणारा आपला एक स्वतंत्र कार्यक्रम आहे हे लक्षात घेऊन त्यावर काम केले पाहिजे. प्रतिगामी संघटना ही आपली अडचण नसून प्रतिगामी संघटनांना लोकांचे मिळणारे समर्थन ही आपली अडचण आहे. म्हणूनच आपण लोकांना संबोधित करणे आवश्यक आहे, लोकांशी बोलणे आवश्यक आहे. लोकांच्या सुखदुःखाशी जोडून घेता येईल, असे कार्यक्रम आपल्याला देता आले पाहिजे आणि त्या कार्यक्रमावर चिकाटीने काम करता आले पाहिजे.
दहा संघटनांमध्ये वावर असलेल्या कार्यकर्ते मित्रांना आता सांगावे लागेल की, सब भूमी गोपाल की ही भूमिका बस झाली. यापुढे तुम्ही मिळालेला वेळ पुरोगामी विचारांना आणि पहिल्या प्राधान्य क्रमवारीत असलेल्या संघटनेला द्या. कारण लोक सातत्याला आणि सामर्थ्याला सलाम करत असतात. कालच्या सत्ताधार्यांना घालवण्यासाठी संघर्ष केला. त्यातून आजचे सत्ताधारी आले. गेली चार पाच निवडणुका आपण हेच करत आलो आहोत. आणखी हे असे किती वर्षं करत बसणार आहोत. दुसर्यांचे ढोल किती काळ बडवणार आहोत? आपल्या मुद्द्यांचे आपण राजकारण प्रभावी कधी करणार आहोत? आपण परिवर्तनवादी आहोत. परंतु, आपली साधने, आपले कार्यक्रम, आपली गाणी, आपली भाषा हे सारे आधुनिक आहेत का? देशाच्या एकूण लोकसंख्येत पंचविशीच्या आतल्या तरुणांची संख्या 53 टक्के आहे. त्यांना जोडून घेण्यासाठी त्यांची भाषा आपल्याला बोलावी लागेल, त्यांची गाणी नव्याने लिहावी लागतील, त्यांच्या नव्या साधनांशी त्यांच्याशी संपर्क करावा लागेल, नवा कार्यक्रम द्यावा लागेल, त्यात नवा आशय ओतावा लागेल. हे सारं करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. पुरोगामी शक्तींना प्रतिक्रिया वादी बनवून ठेवण्यात इथली प्रतिगामी शक्ती यशस्वी झालेली आहे. या ट्रॅपमध्ये अडकायचे नसेल तर आपल्याला आपल्या अजेंड्यावर काम करावे लागेल, ज्या विचारांचे मी काम करतो त्या विचारांचा प्रचारक म्हणूनच मी काम करीन आणि आपल्या कार्यक्रमावर त्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडेन, असा संकल्प नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण करू या.
– शरद कदम
अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल,मुंबई
9224576702