आपत्तीची जबाबदारी सामूहिक

0

धुळे । आपत्ती व्यवस्थापन सामूहिक जबाबदारी आहे. आपत्तीच्या काळात आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवत सतर्कता बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तुकाराम हुलवळे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), नितीन गावंडे (शिरपूर), जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अरविंद मोरे, तहसीलदार अमोल मोरे (धुळे ग्रामीण), रोहिदास वारुळे (शिंदखेडा), महेश शेलार (शिरपूर), ज्योती देवरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता एच. के. ठाकूर उपस्थित होते.

नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा
आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी गाव, तालुका पातळीवर बैठक घेवून नियोजन करावे. तालुका व गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे, विविध समित्या व आपत्ती व्यवस्थापनाचे गट, पथक, संपर्क क्रमांक अशी अद्ययावत माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात सादर करावी. आपत्ती काळात तत्काळ मदतीसाठी संबंधित विभागांनी विभागनिहाय गस्ती पथके तैनात करावीत. सर्व विभागांनी त्यांच्यास्तरावर यंत्रणांची मान्सूनपूर्व बैठक आयोजित करावी. तहसीलदार यांनी रेनगेजची तपासणी करुन सदर यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. आपत्तीनंतर झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. दैनंदिन पावसाची आकडेवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षात सादर करावी. पाटबंधारे विभागाने धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस, धरणातील उपलब्ध पाणीसाठा व विसर्गाची माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष व राज्य नियंत्रण कक्षाला वेळेत उपलब्ध करुन द्यावी, असे त्यांनी सांगितले.

कक्षांना 24 तास वीज पुरवठा
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, नैसर्गिक आपत्ती टाळणे शक्य नसले, तरी तिची तीव्रता कमी करण्यासाठी संबंधित विभागांनी तत्काळ प्रतिसाद दिला पाहिजे. उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करुन बाधितांना मदत मदत कार्यासाठी प्रशासनाने सतर्क राहिले पाहिजे. विभागप्रमुखांनी सतर्क राहिले पाहिजे. या कालावधीत जिल्हा व तालुकास्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. या कक्षांना 24 तास वीज पुरवठा सुरू राहील, असे नियोजन करावे. आपत्तीत शोध व बचावासाठी 43 प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच त्याचे प्रात्यक्षिक घ्यावे. पूर आल्यावर साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. अशा कालावधीत आरोग्य विभागाने साथ रोग यंत्रणासाठी शीघ्र प्रतिसाद पथके तयार ठेवावीत.

पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन
नदी काठच्या संभाव्य पुराचा धोका असलेल्या गावांचा आराखडा सादर करावा. धरण सुरक्षित असलेबाबत खात्री करावी. धरणातून सोडावयाच्या पाण्याचे नियोजन करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी दिले. आपत्ती व्यवस्थापनाबाबत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सविस्तर माहितीही यावेळी देण्यात आली. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलिस उपअधीक्षक सदाशिव पाटील, डॉ. धनंजय नेवाडकर, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, धुळेचे अध्यक्ष डॉ. महेश घुगरी, उपाध्यक्ष अशोक पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.