गेल्या काही दिवसांपासूनसध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा सहभाग असलेलं रिव्हर अँथम भरपूर व्हायरल होतेय. या व्हिडिओमध्ये काही वेगळी गाणी घालून त्या व्हिडिओची नक्कल करणारे काही व्हिडियोदेखील व्हायरल केले जात आहेत जे अत्यंत चुकीचे आहे. अर्थात हे काही आताच होत नाहीये 2014 च्या निवडणुकांच्या काळात सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि अनेक काँग्रेस नेत्यांचेही अशा प्रकारचे फोटो व्हायरल झालेले चांगलेच आठवतेय. याचा अर्थ या विकृत प्रवृत्त्या काळानुरूप चालत आलेल्या आहेत. म्हणजे हे व्हिडिओ बनवणारे आणि त्यावेळी फोटो मॉर्फ करणार्या दोन्ही प्रवृत्त्या एकच.
या विषयावर लिहिताना सर्वप्रथम खूप दिवसांपासून मनात चालत असलेल्या एका व्यक्तीविषयी लिहावंसं वाटतंय. ते नाव म्हणजे अमृता फडणवीस. आपली ओळख केवळ मुख्यमंत्र्यांची पत्नी एवढीच न ठेवता आपली एक स्वतंत्र ओळख बनवली आहे. आपले काम सांभाळून आपल्या गायकीची आवड जोपासत त्यांनी त्या क्षेत्रातदेखील एक नवी उंची प्राप्त केली आहे. अगदी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील त्यांनी अल्बम केला आहे. त्यांच्या या क्रिएटीव्हिटीला आणि आवडीला दाद आणि साथ देणार्या मुख्यमंत्र्यांचे खरोखर आभारच मानायला हवेत. अर्थात मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून त्यांनी हे यश मिळवलं वगैरे या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा त्यांचे टॅलेंटदेखील यामध्ये आहे ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी.
असो, 2014 साली ज्यावेळी भाजपचे सरकार मोठी लाट घेऊन देशात आणि राज्यात आले त्यावेळी अर्थातच जुन्या सरकारविरोधात मोठा असंतोष लोकांमध्ये होता. काँग्रेस सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणांमुळे त्यांना अतिशय वाईट पद्धतीने सत्तेपासून दूर जावं लागलं यात काही शंका नाही. त्यावेळी नरेंद्र मोदी यांची महालाट देशात अवघ्या पाच वर्षांत सुजलाम सुफलाम स्थिती आणेल, अशी भ्रामक अपेक्षा सामान्य माणूस करून होता. मात्र, प्रत्यक्षात घोषणाबाजी शिवाय आणि मोठमोठी स्वप्न दाखवण्याशिवाय काही होताना दिसत नाही. जाहिरातबाजी करण्याचे जबरदस्त कौशल्य असल्याने आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर केल्याने अजूनही भाजपचा फीव्हर लोकांच्या डोक्यावरून उतरायला तयार नाही.
राजकीय घडामोडी आणि प्रभावासाठी सोशल मीडिया काही वर्षांपासून अत्यंत प्रभावी झालाय. या सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून भाजपने काँग्रेसविरोधात जोरदार मोर्चेबांधणी करत देशात सुपडा साफ केला. त्या काळात काँग्रेसला कंटाळलेले लोक सोशल मीडियावरदेखील मुक्तपणे मोदी आणि भाजपचे कौतुक करत होते आणि काँग्रेसला शिव्या देत होते. याचदरम्यान एक विकृतांची फळी सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि अन्य नेत्यांचे मॉर्फ केलेले अतिशय विकृत फोटो सोशल मीडियात शेअर करण्यात व्यस्त होती. त्या फोटोंचा आंबटशौकीन नेटकरी आनंददेखील घेत होते.
आता रिव्हर अँथमच्या निमित्ताने पुन्हा तीच विकृती समोर येतेय. मात्र, आता बाजू उलट्या दिशेने पालटली आहे. सोशल मीडियाच्या वेगवान गतीचा हा परिणाम असावा की चार वर्षांतच भाजपला या गोष्टींचा सामना करावा लागतोय. विरोधी पक्ष म्हणून आता काँग्रेसकडून होणार्या टीकाही भाजपला जिव्हारी लागाव्या अशाच आहेत. हे सरकार आहे का नाटक कंपनी? बीजेपीचे नाव बदलून बँजो पार्टी ठेवायला हवा, असा विखे पाटलांचा टोला असो किंवा राज्य सरकारने मुख्यमंत्री असलेले एक गाण तयार केलं आहे. त्या गाण्यात आमचे मित्र सुधीरभाऊ ही खडकावर उभे असल्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. सुधीरभाऊ खडकावर उभे राहिले हे बघून आम्हाला काळजी वाटली म्हणून आम्ही त्यांना फोन लावला, पण त्यांचा फोन लागला नाही. जर ते त्या खडकावरून पडले तर अर्थसंकल्प कोण मांडणार, असा आम्हाला प्रश्न पडला आहे? असा टोमणा असो हे सरकारला ऐकावेच लागणार आहे.
सोशल मीडिया जन्माला आल्यापासून आपल्याकडे भरपूर टॅलेंट अगदी तासातासाला जन्म घ्यायला लागलेय. आधीच्या काळात व्यंगचित्रांद्वारे एखाद्या घटनेवर किंवा व्यक्तीवर व्यंगबाण सोडले जायचे. मात्र, आता त्याचे व्हर्चुअल रूप आले आहे तेही अगदी वेगवान. आता या रिव्हर अँथम गाण्याचे एडिट केलेले काही तुकडे सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. अर्थात ते सोशल मीडियावर फिरत असल्याने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले असतीलच. कारण त्यांची सोशल मीडिया टीम फार तगडी आहे. सोशल मीडियावर सरकारविरोधी लिहिल्याने अनेकांना नोटीस पाठवल्याचे प्रकरण ताजेच आहे. त्यामुळे हे व्हिडिओ तयार करणार्या लोकांनाही ते नोटीस पाठवतील किंवा पकडतील अशी शक्यता आहेच. जे पेराल ते उगवणार अशी म्हण आपल्याकडे आहे. ही त्याचीच सुरुवात आहे म्हणावे लागेल. या गोष्टीला भाजप किती सहजतेने घेते हे पाहणे आता महत्त्वाचे आहे. नाही तर आपला तो बाब्या आणि दुसर्याच ते कार्ट या नियमाने तो व्हिडिओ शेअर करणार्यांना नोटीस आल्या नाहीत तर नवल वाटायला नको. बाकी मुंबई हल्ल्याच्या घटनेच्या वेळी पुत्रप्रेमात विलासराव देशमुखांचे मुख्यमंत्री पद गेले होते ही घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निश्चितच लक्षात असेल. राज्यात मुंबईचा 26/11 चा भीषण अतिरेकी हल्ला झाला होता. शेकडो निरपराध नागरिकांना अजमल कसाब आणि त्याच्या साथीदार अतिरेक्यांनी गोळीबाराचे शिकार केले होते. मुंबईतील ताज आणि ट्रायडंट सारख्या पंचतारांकित हॉटेलात घुसून त्यांनी अनेकांना ओलीस ठेवले होते, तर अनेकांचा बळीही घेतला होता. त्या हॉटेलचा बराचसा भाग बेचिराख झाला होता. त्या घटनेनंतर राज्यात खूपच तणावाचे वातावरण होते. अशा स्थितीतच बॉलिवूडच्या राम गोपाल वर्मा यांना त्या घटनेत बेचिराख झालेल्या वास्तूंचे आणि रक्ताच्या थारोळ्यांचे चित्रीकरण करण्याचा मोह झाला. विलासरावांच्या चिरंजीवांनी गळ घातल्याने विलासरावांनाही पुत्रप्रेमापुढे गुडघे टेकावे लागले. त्यांचे ते चित्रीकरण मीडियात व्हायरल झाले अन् त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तशी वेळ मीडिया आणू शकते, याचे भान ठेवून फडणवीसांची पावलं पडत असावीत…
अमृताजी एक स्वतंत्र ओळख
खूप दिवसांपासून मनात चालत असलेल्या एका व्यक्तीविषयी लिहावंसं वाटतंय, ते नाव म्हणजे अमृता फडणवीस. आपली ओळख केवळ मुख्यमंत्र्यांची पत्नी एवढीच न ठेवता आपली एक स्वतंत्र ओळख बनवली आहे. आपले काम सांभाळून आपल्या गायकीची आवड जोपासत त्यांनी त्या क्षेत्रातदेखील एक नवी उंची प्राप्त केली आहे. अगदी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतदेखील त्यांनी अल्बम केला आहे. त्यांच्या या क्रिएटीव्हिटीला आणि आवडीला दाद आणि साथ देणार्या मुख्यमंत्र्यांचे खरोखर आभारच मानायला हवेत. त्यांचे टॅलेंटदेखील यामध्ये आहे, ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी.
– निलेश झालटे
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9822721292