’आप’ ला का मिळतोय नकार

0

दिल्लीमधून राज्यसभेसाठी तिघा खासदारांची निवड केली जाणार आहे. या मुद्दावरुन आम आदमी पार्टीत सध्या शितयुद्ध सुरु आहे. पार्टीचे नेते आणि कवि कुमार विश्‍वास यांचे समर्थक मात्र विश्‍वास यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी रेटून लावत आहे. या संदर्भात आम आदमी पार्टीकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रीया आलेली नाही. याशिवाय विश्‍वास यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्यासाठी राज्यसभेची सिट महत्वाची नसून प्रथम देश आणि नंतर पार्टी असल्याचे समर्थकांना सांगितले. आम आदमी पार्टीतल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुमार विश्‍वास राज्यसभेत जाणार हे निश्‍चित आहे. मागील काही काळापासून कुमार विश्‍वास पार्टीच्या धोरणाला सोडून वक्तव्ये केली आहेत त्यामुळे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्यावर नाराज आहेत. राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख 5 जानेवारी ही आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राज्यसभेत पाठवण्यासाठी एक तगडा उमेदवार हवा आहे. त्याकरता त्यांनी अनेकांना ही ऑफर दिली पण ज्यांना ज्यांना संपर्क साधला त्यासगळ्यांनीच नकार दिला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार आम आदमी पार्टीने मोदी सरकारचे कट्टर विरोधक असलेले माजी केंद्रिय मंत्री यशवंत सिन्हा, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, अरुण शौरी यांना विचारणा केली होती. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायधीश टी.एस.ठाकूर, इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती, नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी आणि उद्योजक सुनील मुंजाळ यांच्याशीही यासंदर्भात संपर्क साधलेला आहे. यासगळ्यांनी आम आदमी पार्टीचा राज्यसभेचा प्रस्ताव का नाकारला याचे ठोस कारण पुढे आलेले नाही. मात्र ही मंडळी आम आदमी पार्टीच्या धोरणांबद्दल फारसे समाधानी नसल्याचे बोलले जात आहे.

कुमार विश्‍वास यांच्या समर्थकांनी पार्टीच्या दिल्लीतील कार्यालयात मोठा धुमाकुळ घालत त्यांना राज्यसभेत पाठवण्याची मागणी केली. त्यानंतर कुमार विश्‍वास यांनी सारवासारवी करणारे एक ट्विट केले, पण या ट्विटचे अनेक अर्थ काढता येतील. विश्‍वास म्हणाले की, मी नेहमीच सांगत आलो आहे की, प्रथम देश नंतर पार्टी आणि शेवटी व्यक्ति. पार्टी मुख्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की, त्यांनी स्वराज, बॅक टू बॅक, पारदर्शकतेसाठी लढा द्यावा माझ्यासाठी नको. ध्यानात ठेवा की अभिमन्यूच्या वधात त्याचाच विजय होता. आम आदमी पार्टीच्या कार्यालयात अशीही चर्चा सुरु आहे की, केजरीवालांना आपले पत्ते अद्याप खोलून दाखवायचे नाहीत. त्यांनी याआधीच राज्यसभेत पाठवण्यासाठी तिन नावे निश्‍चित केलेली आहेत. त्यात पार्टीचे नेते संजय सिंग आणि पत्रकारीतेतून राजकिय नेते झालेले आशुतोष यांचे नाव आघाडीवर आहे. संजय सिंग यांना पार्टीमध्ये महत्वाचे स्थान आहे. सगळे पार्टीच्या निर्णयाची वाट बघत आहेत. यासंदर्भात पार्टीच्या बैठकित निर्णय होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे जरी सरकार असले तरी नायब राज्यपालांच्या माध्यमातून केंद्र सरकार अडवणूक करत असल्याचा आरोप वारंवार केला जातोय. याशिवाय दिल्लीमध्ये सरकार असतानाही आम आदमी पार्टीला महापालिकेच्या निवडणुकांमध्ये म्हणावे तसे यश मिळालेले नाही. आम आदमी पार्टीची कोडीं करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून विशेषत: भाजपकडून केला जातोय. त्यामुळे आम आदमी पार्टीला बाहेरील उमेदवारापेक्शा पार्टीतील नेत्यांवरच अवलंबून रहावे लागणार आहे.

– विशाल मोरेकर
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9869448117