आफ्रिकेला नमवीत भारतीय महिलांनी जिंकली मालिका

0

पोटचेफ्सट्रूम । जबरदस्त सूर गवसलेल्या पूनम राऊत आणि कर्णधार मिताली राज यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 102 चेंडू आणि आठ गडी राखून धुव्वा उडवताना चार देशांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका जिंकली. सुरुवातीला गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 40.2 षटकांत 156 धावांत गारद केले. अनुभवी झुलन गोस्वामीने 22 धावांत 3 बळी घेतले. लेगस्पिनर पूनम यादवने 32 धावांत 3 व मध्यमगती गोलंदाज शिखा पांडेने 23 धावांत 2 गडी बाद करीत तिला साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून सून लुस हिने सर्वाधिक 55 आणि मिगोन डू प्रीजने 30 धावा केल्या.

नाबाद 127 धावांची भागीदारी
या लक्ष्याचा पाठलाग करताना दीप्ती शर्मा (8) आणि मोना मेशराम (2) यांची विकेट प्रारंभीच गमावली. मात्र सलामीवीर पूनम राऊतने 92 चेंडूंत नाबाद 70 आणि मिताली राज हिने 79 चेंडूंत नाबाद 62 धावा करीत आणि तिसर्‍या गड्यासाठी नाबाद 127 धावांची भागीदारी करीत संघाला विजय 8 विकेट्सने मिळवून दिला. 100 व्या वन-डे सामन्यात नेतृत्व करणार्‍या मितालीने वन-डेत सलग सहावे अर्धशतक ठोकत ऑस्ट्रेलियाच्या एलिस पॅरी आणि लिंडसे रीलर, तसेच इंग्लंडच्या चार्लोट एडवर्डस् यांच्या विक्रमाची बरोबरी केली. मितालीने या स्पर्धेदरम्यान वनडेत 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रमदेखील केला होता. ती एडवर्डस्नंतर अशी कामगिरी करणारी जगातील दुसरी महिला क्रिकेटर आहे. मिताली राज महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सामन्यांत नेतृत्व करणारी पहिली भारतीय आणि जगातील तिसरी क्रिकेटर बनली आहे.