आमचे ग्रहण अजून सुटलेच नाही!

0

दूरचित्रवाणी ही खरं तर विज्ञानाची देणगी. पण याच साधनाचा वापर करून अनेक वाहिन्या अवैज्ञानिक विचारांना वारेमाप प्रसिद्धी देतात. विज्ञानानं स्वत:वरच सूड घ्यावा, अशी ही विचित्र स्थिती आहे. दूरचित्रवाणी आता घराघरात पोहोचली आहे. या दृकश्राव्य माध्यमाची शक्ती प्रचंड आहे. तिचा उपयोग ग्राहणासारख्या खगोलीय घटनेचा अंधश्रद्धेच्या प्रचार-प्रसारासाठी अजिबात होता कामा नये. ग्राहणासंबंधीच्या अंधश्रद्धा कशामुळे निर्माण झाल्या असतील? त्याचं कारण अगदी साधं असावं. सूर्य आपला जीवनदाता असला तरी त्याच्याकडे थेटपणे पाहणं डोळ्यांना घातक असतं. सूर्यग्रहणाची दृश्यं इतकी विलोभनीय असतात की सूर्याकडे थेट पाहण्याचा मोह होतोच. हा मोह टाळायचा असेल तर लोकांनी मुळात ग्रहण पाहूच नये. दारं-खिडक्या बंद करून घरात बसावं असा विचार आपल्या पूर्वजांनी केला असावा. एखाद्या विचाराला धर्माची जोड दिली की तो विचार सामान्य व्यक्तींना लवकर मान्य होतो. (निदान आपल्या देशात तरी!) त्यामुळं ग्रहणाला ‘अशुभ’ ठरवण्यात आलं असावं.

खरं तर ग्रहण हा निव्वळ सावल्यांचा खेळ आहे. तुमची- माझी सावली पडते तशी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्यग्रहण घडून येते. आमी पृथ्वीची सावली चंद्रावर पडली की, चंद्रग्रहण होते. यासाठी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच पातळीत येणे आवश्यक असते. इतकी ती साधी आणि नैसर्गिक गोष्ट आहे. त्यात अशुभ काहीही नाही.

या काळात दानधर्म करण्याची काहीही गरज नाही. आंघोळीची तर अजिबातच नाही. गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये या विधानाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. इतर व्यक्तींप्रमाणेच गरोदर स्त्रियांनी योग्य ती काळजी घेऊन (म्हणजे चांगल्या दर्जाचे ग्रहण- चष्मे वापरून) ग्रहण पाहण्यास काहीच हरकत नाही. या काळात जेवण करू नये या समजुतीला काहीही पाया नाही. काही वर्षांपूर्वी आम्ही लोक विज्ञान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक प्रयोग केला होता.13 गर्भवती स्त्रियांना ग्रहण पाहण्यास तयार केले होते. तसेच ग्रहण काळात चिरणे, कापणे, खाणे अशा सगळ्या तथाकथित अशुभ गोष्टीही त्यांनी केल्या होत्या. नंतर जेव्हा एकेकीचे दिवस भरले तसतसा आम्ही डॉक्टरांच्याकडे सुरू केला, आणि त्या बाळंत झाल्यावर त्यांना होणारी संतती निरोगी आणि निरव्यंग झालेली पाहिल्यावर तर हे सिद्धच झाले की या सगळ्या अंधश्रद्धा आहेत!

जेट जगदीश
सामाजिक कार्यकर्ते, मुंबई