मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र आमच्या घरातून फक्त मीच निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. ना पार्थ, ना शरद पवार, आमच्या घरातून केवळ मीच लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
आमच्यासाठी प्रत्येकजण आणि प्रत्येक मतदारसंघ महत्त्वाचा आहे. लोकांना लढायची इच्छा आहे हे पक्षासाठी चांगलं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला होणारा विरोध यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या उमेदवारीला कोणी विरोध केला, याबद्दलची माहिती माझ्याकडे नाही. उदयनराजेंबद्दलची चर्चा माझ्यापर्यंत आलेली नाही. आम्ही तिकिटं लादणार नाही. तर कार्यकर्त्यांच्या भावना बघूनच उमेदवारी देऊ. अनेक मतदारसंघातून अनेक कार्यकर्ते निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं.
पार्थनं भविष्यात राजकारणात यायची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना उमेदवारी दिली जाईल का, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. मात्र त्यांनी त्यावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. आमची मावळची बैठक झाली. त्यात पार्थनं कोणतीच इच्छा व्यक्त केली नाही. भविष्यात काय होईल, हे आताच सांगता येणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.