आमदारांच्या बंगल्यासमोरील पथदिवे गेले विझून!

0

नवी मुंबई । राज्य, केंद्र आणि पनवेल महापालिकेची सत्ता हाती असली तरी भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले पूर्वाश्रमीचे शेकापचे खासदार, भाजपचे आमदार आणि महापालिकेतील गटनेत्यांच्या बंगल्यासमोरील पथदिवे विझून गेले आहेत. ते महापालिकेने तत्काळ लावावेत, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीने करून सत्ताधार्‍यांना ‘उजेडात’ आणण्याची मागणी महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन केली.

आयुक्त डॉ. शिंदे यांनी तत्काळ संबंधित खात्याच्या महिला अधिकार्‍यांना दालनात बोलावून याविषयी माहिती घेतली असता, संघर्षच्या मागणीला त्यांनी दुजोरा दिला. त्यामार्गासह शहरातील विझलेले सर्व दिवे तात्काळ बदलण्याचे निर्देश डॉ. शिंदे यांनी दिले. मात्र, सत्तेच्या अंधारात बुडालेल्या नेत्यांना त्यांच्या घरासमोरील अंधार दिसू नये, याविषयी चर्चा सुरू असताना उपस्थितीत हास्यकल्लोळात बुडाले. तसेच डॉ. शिंदे यांनीही स्मितहास्य केले. शहरातील महत्वाच्या कामांसंदर्भात संघर्ष समितीचे काही सदस्य उज्वल पाटील, चंद्रकांत शिर्के, मंगल भारवाड, श्री गुप्ता, अजित अडसुळे आदींच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली आज अचानक, डॉ. शिंदे यांची त्यांच्या दालनात दुपारी भेट घेतली.

मान्सूनपूर्व काळातील कामांना तात्काळ सुरूवात करावी. पनवेल महापालिका क्षेत्रातील शहरे, ग्रामीण भागात सांडपाणी साचू नये, म्हणून व्यवस्थित निचरा व्हावा, तसेच नाले सफाईचे काम हाती घेवून 15 एप्रिलपर्यंत ती कामे पूर्ण करावीत, अशी महत्वपूर्ण मागणी संघर्ष समितीने करताच, येत्या दोन तीन दिवसात स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेतून बाहेर पडताच, ती कामे हाती घेवून पुढील पंधरा दिवसांंत नाले सफाईचे काम पूर्ण करू, असे आश्‍वासन डॉ. शिंदे यांनी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले. आपत्कालीन व्यवस्थेबाबत तक्रार करताना कडू यांनी आपत्कालीन व्यवस्थेचे तीनतेरा कसे वाजतात?, याची काही उदाहरणे दिली. त्यामध्ये समितीची स्थापना, अधिकार्‍यांचे पत्ते, संपर्क नंबर मागील वर्षाच्या यादीवरून पुढे रेटले जातात. मात्र, ते अधिकारी बदली झालेले असतात, तरी त्याकडे कानाडोळा करून ती यादी प्रसिद्ध केली जाते आणि मग सर्वांनाच तोंडघशी पडण्याची पाळी येते, असे कडू यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत आपण सजगतेने लक्ष देऊन समितीची स्थापना आणि यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी पडताळून पाहू, असे आश्‍वसन डॉ. शिंदे यांनी संघर्ष समितीला दिले. शहरातील तलावांचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण करण्याच्या यापूर्वी संघर्षने केलेल्या लेखी मागणीचे स्मरण आयुक्तांना कांतीलाल कडू यांनी करून दिले.