भुसावळ : आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदू संस्कृतीबद्दल आक्षेपार्ह विधान करून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी शहरातील समस्त ब्राह्मण समाजाने करीत या संदर्भात प्रांताधिकारी व पोलिसांना शुक्रवारी निवेदन दिले.
आक्षेपार्ह विधानामुळे भुसावळात संताप
इस्लामपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत आमदार मिटकरींनी हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करीत सामाजिक द्वेष पसरवल्याने त्यांनी समाजाची माफी मागावी तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीने केली. मिटकरी हे आमदार असून त्यांनी हिंदू समाजात पौरोहित्य करणार्यांबाबत व विवाह परंपरेबाबत स्वतःला कुठलेही ज्ञान नसताना चुकीचे विधान करीत ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवली असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
निवेदन देताना यांची उपस्थिती
याबाबत ब्राह्मण समाज बांधवांनी प्रांताधिकारी तसेच पोलिस प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी ब्राह्मण समाजाचे उमाकांत (नमा) शर्मा, दीपक पाथरकर, जयप्रकाश शुक्ला, योगेश तिवारी, शंतनू गचके, देवेश कुलकर्णी, वैजनाथ कुळकर्णी, सागर पत्की, दीपक कुलकर्णी, लोकेश मदन जोशी, अॅड. अभिजीत मेणे, भूषण जोशी आदींची उपस्थिती होती.