आठ दिवसाचा अल्टीमेंटम ; दुर्गंधीचा त्रास थांबवण्याचे बजावले
चाळीसगाव- तालुक्यातील नव्याने भरभराटीस आलेल्या खडकी एमआयडीसी मध्ये गुजराथ अंबुजा मका प्रक्रिया उद्योग सुरू झाला आहे मात्र या फॅक्टरीमधून दीड दोन महिन्यांपासून अतिशय दुर्गंधीयुक्त घाणेरडा वास येत असल्याने नागरीक त्रस्त आहेत. सुरवातीला खडकी गावाजवळ दुर्गंधीयुक्त वासामुळे गावकरी हैराण झाले. याबाबत त्यांनी अनेकदा तोंडी व लेखी तक्रार केली होती मात्र या दुर्गंधीने आता शहराकडे प्रवेश केला असून जनतेत् आरोग्याची भीती निर्माण झाली आहे. या विरोधात तहसीलदार कैलास देवरे यांचेकडे संभाजी सेना , रयत सेना यांनी निवेदन देऊन हा उग्र वास बंद करण्याची मागणी केली होती. अखेर गुरुवारी सांयकाळी आमदार उन्मेष पाटील यांनी आपले सहकारी भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, युवा नेते जितेंद्र वाघ यांच्या सह कारखान्यावर धडक दिली. यावेळी कंपनीचे मालक संदीप अग्रवाल, अध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे, व्यवस्थापक माने उपस्थित होते.
आमदारांनी विचारला जाब
आमदार उन्मेष पाटील यांनी खडकीसह शहरात येत असलेल्या दुर्गंधीविषयी जाब विचारला भुसावळला होणारा प्रकल्प मी मुख्यमंत्री महोदयांना भेटून चाळीसगावी आणला. कंपनीच्या स्थापनेसाठीच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी मदत केली, असे असतांना कंपनीतून निघणारा हा घाणेरडा वास नागरीकांना त्रासदायक ठरतो आहे याचा बंदोबस्त करावा शहर व ग्रामीण भागातील माझ्या जनतेच्या आरोग्याशी होणारा खेळ मी खपवून घेणार नाही, असा सज्जड दम त्यांनी भरल्याने कंपनी प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. येत्या आठ दिवसात हा उग्र वास बंद करा तो पर्यत गरज असेल तर उत्पादन बंद ठेवावे, असे त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला बजावले. संबंधितांनी परदेशातून व देशातील उच्च तंत्रद्य मागवून या समस्येवर उपाययोजना करण्याची हमी दिली असल्याचे आमदार उन्मेष पाटील यांनी ‘जनशक्ती’शी बोलतांना सांगितले.
डरने की कोई बात नही -प्रेसिडेंट
कंपनीत मका प्रक्रिया केली जाते, मक्यावर अन्न प्रक्रिया केली जाते त्यामुळे तसा वास येतो आहे मात्र याचा जनतेच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होणार नाही त्यामुळे कोणीही घाबरू नका आम्ही या वासाची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजना आरंभली आहे, तब तक किसीको कोई डरने की आवश्यकता नही, अशी माहिती कंपनी प्रेसिडेंट ब्रिजमोहन चितलांगे यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना दिली.