मुक्ताईनगर। आमदार एकनाथराव खडसे यांची कथित दाऊद संभाषणप्रकरणी प्रिती मेनन यांनी बदनामी केल्याने यामागील सुत्रधारांना अटक करण्याची मागणी तालुका भाजपातर्फे करण्यात आली आहे. याबाबत पक्षातर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
यात नमूद करण्यात आले की, आमदार खडसे यांचे दाऊद इब्राहिमची पत्नी मेहजबीन हिच्याशी फोनवरुन संभाषण झाल्याचे हॅकर भंगाळे याच्या पुराव्यावरुन प्रिती मेनन यांनी बदनामी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने हे प्रकरण फेक असल्याचे सांगून याचिका फेटाळली व एटीएसला चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीनंतर यात काहीही तथ्य नसल्याने एटीएसने आमदार खडसे यांना क्लिनचिट दिली. त्यामुळे जाणिवपुर्वक बदनामी करणार्या हॅकर मनिष भंगाळे व कथित सामाजिक कार्यकर्त्या प्रिती मेनन यांच्या बोलवित्या धन्यास त्वरीत अटक करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेेडण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. या निवेदनावर विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पंचायत समिती सभापती राजेंद्र माळी, जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, तालुका सरचिटणीस सतिश चौधरी, संदिप देशमुख, सरपंच ललित महाजन, अनु. जाती तालुकाध्यक्ष जयपाल बोदडे, गुणवंत पिवटे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष संजय पाटील, कोषाध्यक्ष राजू खंडेलवाल, शहराध्यक्ष मनोज तळेले, सहकार आघाडी तालुकाध्यक्ष राम पाटील, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, सुनिल काटे, महेश भोळे यांच्या स्वाक्षर्या आहे.