आमदार जगताप यांचा नगर हत्याकांडात संबंध नाही, खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा

0

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे प्रतिपादन
राजकीय दृष्ट्या गोवण्यात आले असल्याचा आरोप

मुंबई:- संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या अहमदनगरच्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि अरुण जगताप हे निर्दोष असून या हत्यांमध्ये त्यांचा काहीही संबंध नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला असून हि घटना दुर्दैवी असून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणीही तटकरे यांनी केली. या प्रकरणात जे दोषी आढळून येतील त्यांना शिक्षा व्हावी असेही ते म्हणाले. हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, संग्राम जगताप हे अतिशय संयमी नेते असून त्यांना कुठलीही गुन्हेगारी पार्श्ववभूमी नाही. त्यांना राजकीय दृष्ट्या गोवण्यात आले असल्याचेही तटकरे यावेळी म्हणाले. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.

लोकांचा रोष आणि संताप दिसून येतोय
हल्लाबोल आंदोलनाला मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या परिसरात जसा प्रतिसाद तसाच प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रातही लाभला. तरुण वर्ग, महिला वर्ग रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांचा रोष आणि संताप दिसून येत होता. मोठा गजावाजा करत या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. मेक इन महाराष्ट्र, मैगनेटीक महाराष्ट्र या उपक्रमांच्या माध्यमातून ८ लाख कोटींची गुंतवणूक होईल असे सरकारतर्फे सांगितले गेले होते. मात्र असे काहीच झाले नाही. मोठ्या जाहिराती करून सरकारने फक्त स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा काम केले आहे असा आरोप तटकरे यांनी केला.

रिक्त पदे न भरण्याचा सरकारचा घाट
यावेळी तटकरे म्हणाले कि, आंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने हणून पाडला त्यामुळे त्यांच्या मनात राष्ट्रवादीबाबत सहानुभूती आहे. एसटीचे खासगीकरण होते की काय अशी भीती एसटी कर्मचाऱ्यांचे मनात आहे. जिल्हा बँकांमध्ये नौकऱ्या उपलब्ध होत्या, त्याबाबतीत परीक्षाही घेतल्या गेल्या होत्या मात्र सरकारने त्याही भर्त्या राजकीय कुहेतूने बंद केल्या. राज्यातील बेरोजगार तरुणांच्या मनात अशी शंकाही की हे सरकार सर्वच रिक्त पदे न भरण्याचा घाट सरकारने घातला असल्याचे तटकरे म्हणाले.

आमची दखल न घेणाऱ्यांना जनता बेदखल करेल
यावेळी तटकरे म्हणाले कि, गिरीश महाजन म्हणतात की हल्लाबोल आंदोलनाबाबत आम्हाला माहिती नाही. त्याबाबत एकही निवेदन मिळाले नाही. सर्व प्रांताध्यक्षांना, तहसीलदारांना याबाबत निवेदन दिले आहे. गिरीश महाजन असे म्हणत असतील तर मंत्रालय आणि स्थानिक पातळीवर संवाद नसल्याचा आरोपही तटकरे यांनी केला. २०१९ साली जनता आमची दखल घेईल आणि या सरकारला बेदखल करेल, असेही तटकरे म्हणाले. येत्या ६ मे पासून हल्लाबोल आंदोलनाचा पाचवा टप्पा कोकण येथून सुरू होणार. ६ मे ते ७ पालघर, ११,१२, १३ ठाणे, १ जून ते ५ जून सिंधुदुर्ग, रायगड येथे असेल.

मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रापेक्षा गुजरातवार जास्त प्रेम
यावेळी नाणार प्रकल्पाबाबत बोलताना तटकरे यांनी सांगतिले कि, कोकणवासीयांची मोठी फसवणूक सरकारने केली आहे. फडणवीस म्हणतात हा प्रकल्प इथे नाही झाला तर तो गुजरातला जाईल यातून मुख्यमंत्र्यांचे गुजरात प्रेम दिसते. याआधीही इथले अनेक प्रकल्प इथून गुजरातला गेली आहे. कोणाच्या भीतीमुळे हे प्रकल्प गुजरातला जात आहे ते स्पष्ट व्हायला हवे, असेही तटकरे म्हणाले. आम्ही सरकारमध्ये असताना कोकणात रासायनिक प्रक्रिया करणारे प्रकल्प नकोत अशी भूमिका आम्ही घेतली होती. पर्यावरण उद्ववस्त करणाऱ्या या प्रकल्पाला आम्ही आधीपासूनच विरोध करतोय. १० मे रोजी शरद पवार या प्रकल्पाच्या ठिकाणी भेटदेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या प्रकल्पाबाबत माहिती नाही, मुख्यमंत्र्यांनी हा सवाल शिवसेनेला विचारावा, असेही तटकरे म्हणाले.