आमदार महेश लांडगेंच्या पोटापाण्यासाठी भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण

0
भोसरीच्या आमदाराला पराभव होण्याची भिती; त्यामुळेच स्वहित जोपासण्यासाठी खटाटोप
विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा गंभीर आरोप
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधार्‍यांचा भ्रष्टाचारी व गैरकारभाराच्या विरोधात सभागृहात आंदोलन केले. मात्र, गोंधळात भोसरीतील नवीन रुग्णालयाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव चुकीच्या पध्दतीने मंजूर करून घेतला. तो निर्णय कायदेशीर पध्दतीने आयुक्तांना रद्द करण्यास भाग पाडणार आहे. तथापि, या खासगीकरणात आमदार महेश लांडगेंचा हात असून नवीन व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा खटाटोप असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच, सभागृहातील मंजूर विषय पुन्हा अजेंड्यावर आणून सभा घेण्याची मागणी देखील साने यांनी केली आहे.
काळजे यांनी बोलण्यात व्यत्यय आणला…
सत्ताधारी नेते हॉस्पीटल आणि संतपीठाचा भ्रष्टाचार ऐकविण्यास तयार नाहीत. शिवसेना, मनसेकडून व्यक्त झालेला संशय खोडून काढत दत्ता साने म्हणाले की, मी भ्रष्टाचारावर बोलणार म्हणून मला सभागृहात जाईपर्यंत मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला. आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात सभागृहात बोलत होतो. पुरावे देत होतो. परंतु, महापौर राहूल जाधव यांचा आडमुठेपणा व माजी महापौर नितीन काळजे यांनी माझ्या बोलण्यात व्यत्यय आणला. म्हणून, आम्हाला महापौरांसमोर आंदोलन करावे लागले. नंतर सभेतील विषय सभापटलावर न ठेवता अचानक मंजूर करणे घटनाबाह्य आहे. हे विषय मंजूर केले, तरी त्यांची अंमलबजावणी करण्यात येऊ नये, असेही साने म्हणाले.
विषय गोंधळात मंजूर…
चिखलीतील संतपीठाच्या कामात रिंग झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि हे काम रद्द करावे, अशी मागणी केली आहे. मात्र, त्याबरोबर भोसरी रुग्णालय खासगीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. ही बाब देखील गंभीर आहे. त्यावर नगरसेवकांना चर्चा करायची असताना भाजपने तो विषय गोंधळात मंजूर केलेला आहे. ते बेकायदेशीर असून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या दबावामुळे ते झालेले आहे. रुग्णालयाचे 30 वर्षे खासगीकरण करून त्या ठिकाणी आपला व्यावसाय चालविण्याचा उद्योग आमदारांचा सुरू आहे, असा आरोप साने यांनी केला.
डॉ. रॉय पाहणार रुग्णालयाचा कारभार?
आमदार महेश लांडगे यांच्या सुचनेनुसार भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी तयार केला आहे. ते महापालिका सेवेचा राजीनामा देवून हे खासगी रुग्णालय चालविणार असल्याचाही थेट आरोप दत्ता साने यांनी केला आहे. पालिकेला खासगीकरणाव्दारे असा धंदा चालवायचा असेल, तर नागरिकांनी आरक्षणाच्या जागांचा ताबा देवू नये, असे आवाहनही साने यांनी केले आहे.