पुणेः आमदार योगेश टिळेकर यांचा भाऊ चेतन टिळेकर यावर कोंढवा पोलीस ठाण्यात महिलेसह तिच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी कोंढवा येथील टिळेकरवाड्यात घडला असून सीताबाई हुनमंत गिते (वय-40, रा. भोलेनाथ चौक कोंढवा), यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
सीताबाई यांचा मुलगा अतूल याचे चेतन टिळेकर यांच्या गाडीवरील चालकासह 23 फेब्रुवारीला भांडण झाले होते. ते भांडण तिथेच संपले होते. मात्र चेतन याने सीताबाई आणि त्यांचा मुलगा अतूल यांना गुरुवारी टिळेकर वाड्यावर हे भांडण मिटवून घेण्यासाठी बोलावले होते. सीताबाई या त्यांच्या मुलासह टिळेकर वाड्यावर गेल्या असता चेतन टिळेकर यांनी अतुल याला शिविगाळ करीत मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी सीताबाईमध्ये पडल्या असता चेतन यांनी त्यांनाही मारहाण केली. या प्रकाराबद्दल सीताबाई यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चेतन टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.