असलोद:शहादा– तळोदा मतदारसंघातील आ.राजेश पाडवी यांनी तळोदा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेतील अतिदुर्गम भागातील गावांना भेट देऊन तेथील समस्यांबाबत गावकऱ्यांशी चर्चा करून विकास कामांची पाहणी केली. याभागात पोहोचण्यासाठी आ.पाडवी यांनी चक्क पाच किलोमीटर पायपीट करून प्रत्येक गाव व पाड्यांना भेट दिल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
शासकीय योजनांचा लाभ मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला व्हावा, यासाठी आ.राजेश पाडवी हे मतदार संघातील प्रत्येक गाव पाड्यात भेट देऊन तेथील नागरिकांची विविध विषयांवर चर्चा करीत समस्या जाणून घेत असतात. या चर्चेदरम्यान नागरिकांनी सुचवलेल्या विकास कामांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. रविवारी आ.पाडवी यांनी तळोदा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेतील अतिदुर्गम भागातील
माळखुर्दे, चिडमाळा, देवचौकडी याठिकाणी चक्क पाच किलोमीटर पायपीट करत जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. याठिकाणी गावाची व पाड्यावरची पिण्याच्या पाण्याची, दळणवळणासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याची, हायमास्ट लाईट, सोलर लाईट आदी विकास कामांची पाहणी केली.
आपल्या भागात स्वतः आमदार आल्याने या गावातील गावकऱ्यांनी आमदारांशी बिनधास्तपणे चर्चा करीत दैनंदिन जिवन जगत असताना उद्भवणाऱ्या समस्याचा पाढा वाचला.
यावर आ. राजेश पाडवी यांनी गावकऱ्यांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे नागरिकांच्या हितासाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना आपल्यापर्यंत पोहचवु यादरम्यान गावात सरकारमार्फत वाटप झालेले धान्य पोहोचल्याची माहिती घेतली. आरोग्यविषयी चर्चा करण्यात आली.
यावेळी आ. राजेश पाडवी,विरसिंग पाडवी, तळव्याचे माजी सरपंच नारायण ठाकरे, विठ्ठलराव बागले, प्रविण वळवी, गुड्डू वळवी, हिरामण पाडवी, धारासिग वसावे, बोखा पाडवी, सोनु पाडवी, हर्षल वळवी उपस्थित होते.