भुसावळला भारिप बहूजन महासंघाचा गोंधळ; खासदार खडसेंचे पुनर्वसनाचे आश्वासन
भुसावळ-आम्ही उध्वस्त झालो, संसार रस्त्यावर आला तरी गेल्या दोन वर्षांपासून आमदारांसह नगराध्यक्षांनी रेल्वे हद्दीतील आमच्या झोपडीत कधी डोकावून पाहिले नाही, आमच्या निवाऱ्यासाठी रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली नाही असा आरोप करीत संतप्त भारिप बहूजन महासंघाच्या कार्यकर्त्यांसह महिला अतिक्रमणधारकांनी आज शासकीय विश्रामगृहात खासदार रक्षा खडसे यांच्यासमोर गोंधळ केला.
रेल्वे हद्दीतील अतिक्रमण काढण्यास दोन दिवसांपासून सुरवात झाली आहे. त्यामुळे बेघर झालेले महिला व पुरुष रहिवासी शासकीय विश्रामगृहात धडकले. आज तिसऱ्या दिवशी बहिणाबाई महोत्सवाची माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात खासदार रक्षा खडसे यांची पत्रकार परिषद सुरु असताना हा प्रकार घडला. दरम्यान, माहिती मिळताच शहरचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब ठोंबे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले, बाजारपेठचे छोटू वैद्य व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत समजोत्याचा प्रयत्न केला.
आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा. सुनील नेवे, प्रा. दिनेश राठी, राजेंद्र आवटे, प्रकाश बतरा, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, वसंत पाटील, देवा वाणी, गिरीश महाजन, अनिकेत पाटील, पवन बुंदेले, सतीश सपकाळे आदी उपस्थित होते.
पुनर्वसनाचा प्रयत्न करु
न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे प्रशासन कारवाई करीत आहे. आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवकांनी वेळोवेळी रेल्वे विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केली आहे. तुमच्यामधील खरोखर बेघर असतील आणि ज्यांची गावात दुसरी घरे नाहीत अशा रहिवाशांची यादी द्यावी, त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करु असे खासदार खडसे म्हणाल्या. सुमारे अर्धा तासापेक्षा जास्त अतिक्रमणधारकांनी तीव्र भावना मांडल्या तर काही महिलांना अश्रु अनावर झाले.
पर्यायी जागा द्या
राहुल नगरजवळील गट क्रमांक 77 ब मधील एक एकर जागेवर किमान 80 घरांचा प्रश्न सुटु शकतो, ती हरिजन स्मशानभूमिची जागा होती. मध्यंतरी एका बिल्डरने ती जागा बळकावण्याचा प्रयत्न केला असे भारिप बहूजन महासंघाचे बाळा पवार म्हणाले. लोणारी मंगल कार्यालयाजवळील घरकुलांमध्ये पुनर्वसित झालेल्या वंचितांना बाहेर काढू नये अशी मागणी केली. त्यावर नगराध्यक्षांनी घरकुले ही शासकीय योजनेतील असल्याने ती अशा प्रकारे देता येत नाही असे स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार : सावकारे
खोटे आरोप होत असल्याचे पाहून संतप्त झालेले आमदार सावकारे यांनी अतिक्रमणधारकांसाठी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगितले. तसेच गट क्रमांक 77 ब वा इतर पर्यायी जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले. तसेच पाच रहिवाशांची समिती तयार करुन खऱ्या बेघरांची यादी द्यावी अशी सुचना केली ती अतिक्रमणधारकांना मान्य झाली.
रहिवाशांना भडकविले : रमण भोळे
अतिक्रमणधारकांना कोणीतरी भडकविण्यात आल्याने हा रोष निर्माण झाला आहे. खासदार खडसे, आमदार सावकारे यांनी प्रत्येकवेळी पुढाकार आणि पाठपुरावा घेतल्याने वर्ष-दीड वर्षाची मुदतवाढ मिळाली. मागील वर्षी विद्यथ्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने मोहिम पुढे ढकलली होती. तापी नदी काठावर चाळीस एकर जमीनीचे सपाटीकरण करुन बेघरांसाठी आधीच व्यवस्था केली आहे असे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले.