आमदार हरीभाऊ जावळेंच्या पाठपुराव्यानंतर फळपीक विम्याची रक्कम वर्ग

0

रावेरसह यावल तालुक्यातील केळी उत्पादकांना दिलासा

फैजपूर- हवामानावर आधारीत फळ पीक विम्याची 32 टक्के रक्कम राज्य शासनाकडे काही तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित होती. रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार हरीभाऊ जावळे यांनी याबाबत 16 ऑक्टोबर रोजी कृषी मंत्री तसेच कृषी विभागाचे प्रधान सचिव यांची तत्काळ भेट घेऊन ही रक्कम तत्काळ राज्य शासनाकडून विमा कंपनीकडे वर्ग करण्याबाबत पाठपुरावा केल्यानंतर 17 रोजी हवामानावर आधारीत फळ पीक विम्याची 32 टक्के रक्कम एकूण 53 कोटी रुपये राज्य शासनामार्फत विमा कंपन्यांकडे वर्ग करण्यात आल्याचा अध्यादेश शासनाने काढला. हा राज्य शासनाचा हिस्सा विमा कंपनीकडे वर्ग करण्यात आल्याने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पुरेपूर नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याचप्रमाणे, रावेर-यावल तालुक्यामध्ये शासकीय ज्वारी-मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आमदार जावळे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे मागणी केलेली होती. त्याच पार्श्वभूमीवर ज्वारी व मका या धान्याची ऑनलाईन नोंदणी येत्या दोन दिवसांमध्ये सुरू करण्यासंदर्भातील आदेशही काढण्यात आला. शासकीय खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांना चांगला भाव देण्यात येणार असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार हरीभाऊ जावळे यांनी केले आहे.