सध्या बातम्यांच्या मथळ्यात नेहमीच अभिनेत्री कंगना रानावत झळकताना दिसते. आज तिचा आगामी ‘सिमरन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ती त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण ती या चित्रपटापेक्षाही देत असलेल्या मुलाखतींची सध्या चर्चा अधिक होत असताना दिसते. एका नव्या गोष्टीमुळे सध्या कंगना चर्चेत आली आहे. यावेळी तिने कोणतेही विधान केलेले नाही, तर तिने चक्क आमिर खान भूमिका करीत असलेल्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याच्या बातमीमुळे सध्या ती चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या हिमतीवर बिनधास्त कंगना स्थान टिकवून आहे. कंगनाला यापूर्वी सलमान खान, शाहरुख खान यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. पण तिने त्यांना नकार दिला होता. आता तिने मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानलादेखील नकार दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वात पहिल्यांदा कंगनाचा विचार पुढील वर्षी प्रदर्शित होणार्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ चित्रपटासाठी झाला होता. पण तिने नकार दिल्यामुळे दुसर्या अभिनेत्रींचा विचार करावा लागला. आमिरसोबत अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.