आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना मारहाण, लुटालुट
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने पकडून दिले पाकिटमाराला
आकुर्डी : सायंकाळी चार…आकुर्डी रेल्वे स्थानक…दोन ‘पोलीस’ स्थानकात शिरले…तपासणी करायची आहे सांगत प्रवाश्यांना दरडावू लागले. बॅग, खिसे तपासून लागले. तपासता तपासता पैसे हिसकावत मारहाणही करू लागले… हा प्रकार घडत असल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी पॉईंटस्मन दत्ता खाडे आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, पदाधिकारी अमित डांगे, संतोष चव्हाण, अमोल कानु यांनी लगेच फ्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर धाव घेत रेल्वे पोलीस विभागाला कळविले. तसेच समिती पोलीस मित्र जयेंद्र मकवाना, संजय प्रधान, रेखा भोळे, गौरी सरोदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. आर. खान आकुर्डी स्थानकावर पोहचले आणि उलगडा झाला. ते पोलीस नव्हे, तर पाकिटमार निघाले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून हिसका दाखविला.
हे देखील वाचा
पोलीस मदत केंद्र हवे
याबाबत समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, या स्थानकावर चाकरमान्यांमुळे वर्दळ वाढत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे तसेच प्राधिकरण परिसरामुळे दरोरोज रेल्वे प्रवासी वाढत आहेत. विद्यार्थ्यांची संख्याही हजारात आहे. त्यामुळे गुंड आणि पाकीटमारांच्या गुन्हेगारीचा आलेखही आकुर्डी स्थानकावर वाढीस लागला आहे. दिवसाआड या ठिकाणी प्रवाश्यांवर, तसेच त्या ठिकाणी नियुक्त असलेल्या रेल्वे कर्मच्यांवरही हल्ले होत आहेत. यावर प्रतिबंधक उपाय म्हणुन आरपीएफ जवानांबरोबर प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पोलीस मित्र रात्री गस्त घालत आहेत. परंतु दिवसाही आता गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने आकुर्डी पोलीस स्थानकावर तात्काळ पोलीस मदत केंद्र किंवा पोलीस ठाणे कार्यान्वित करणे अत्यावश्यक आहे.
पोलीस मित्रांची मोठी मदत
स्टेशन मास्तर राजेंद्र जी. गाडेकर म्हणाले, 3 तारखेच्या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आकुर्डी रेल्वे स्थानकाची सुरक्षितता वाढत्या गुन्हेगारीमुळे धोक्यात आली आहे. प्रशासनाने या समस्येच्या निराकरणासाठी तातडीने पावले उचलली पाहिजे. सध्या समिती पोलीस मित्रांची मोठी मदत व सहकारी प्रवासी व रेल्वे कर्मचार्यांना मिळत आहे.