‘आम्ही मुळशीकर’ प्रतिष्ठानचा स्नेहमेळावा

0

पुणे । कसे जगावे हे शिवरायांकडून शिकावे, तर कसे मरावे, हे संभाजी राजांकडून शिकावे. तसेच प्रतिकूलतेला अनुकूल कसे बनवायचे, हे छत्रपती संभाजींकडून शिकावे. आपला इतिहास उज्ज्वल आहे. तसाच आपला वर्तमान व भविष्यकाळही उज्ज्वल करता आला पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील
यांनी केले.

‘आम्ही मुळशीकर’ प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात ‘छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर ते बोलत होते. वर्धापन दिनानिमित्ताने स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना ‘मुळशी गौरव पुरस्कार : 2017’ देऊन गौरविण्यात आले. गुरुकुल संकुल उभारणारे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू शंकर कंदारे, अत्याधुनिक पद्धतीने शेती करणारे प्रमोद मांडेकर, राष्ट्रपतीपदक विजेते पोलिस अधिकारी कैलास मोहोळ, जलतरण स्पर्धांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील 50 पारितोषिकांचा मानकरी ठरलेला इयत्ता आठवीतील विद्यार्थी नतीश कुडले, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा तिसरा विजेता मुन्ना झुंझुर्के यांनाही विशेष गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच ‘पोलिस भरती मार्गदर्शन’ या विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आले.मुळशीकर प्रतिष्ठान हे हक्काचे व्यासपीठ आहे. मुळशी तालुक्याचे नाव जास्तीत जास्त मोठे करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे मोहोळ यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. ‘आम्ही मुळशीकर परिवारा’तर्फे विद्यार्थी, युवक आणि महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुळशीचा विकास करणे, हेच संस्थेचे ध्येय असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. गणेश सातपुते यांनी सांगितले.