‘आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा’ असा कारभार सध्या देशात सुरू आहे – शरद पवार

0

पुणे : ‘न्यायालय, राज्यघटना, स्त्री-पुरुष समानता यापैकी काहीच भाजपवाले मानत नाहीत. त्यांच्या प्रत्येक विधानातून आणि कृतीतून हेच दिसतं. ‘आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा’ असा कारभार सध्या देशात सुरू आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्र सरकारवर केली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पवार यांनी केंद्र सरकारसह भाजपवरही जोरदार टीका केली. ‘सीबीआयमध्ये जे काही झालं. ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या ते देशासाठी घातक होतं. आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा असा इशाराच सरकारनं प्रशासनाला यातून दिला, असं पवार म्हणाले. ‘सर्वोच्च न्यायालयानं सबरीमलामध्ये महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले. पण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ज्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही असे निर्णय न्यायालय कसं देऊ शकतं असं शहा म्हणतात. भाजपवाल्यानं देशाची घटना, न्यायालयाचे आदेश मान्य नाहीत हेच यातून दिसतं,’ असं पवार म्हणाले. दुष्काळाच्या प्रश्नावरही भाजपचं सरकार गंभीर नाही. दुष्काळाच्या झळा सर्वांना बसताहेत. पण सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. लोकांचे प्रश्न न सोडवणाऱ्या या सरकारची सत्ता लोकशाहीच्या मार्गानं हिसकावून घेऊ,’ असंही पवार म्हणाले.