मुंबई – अहमदनगर महानगरपालिकेमध्ये २४ जागांवर विजय मिळवीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र असे असतांना देखील १४ जागांसह तिसऱ्या स्थानी असलेल्या भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दिलेल्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर आणि उपमहापौरपद झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे राज्यातील राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले होते. तसेच यामुळे भाजपा आणि शिवसेना यांच्यातील तणावही वाढला आहे. दरम्यान, नगरमध्ये भाजपा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार असतानाही तिथे भाजपाचाच महापौर कसा बनला? याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले आहे.
‘नगरमध्ये शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी भाजपा तयार होता. स्थानिक पातळीवर बोलणी सुरू होती. मी सुद्धा सेनेकडून मागणी झाल्यास पाठिंबा द्या, असे सुचवले होते. मात्र महापौर निवडीच्या तीन दिवस आधीपर्यंत शिवसेनेतून कुणीही आमच्याशी बोलण्यास तयार नव्हते. मात्र पाठिंब्यासाठीचा प्रस्तावही शिवसेनेकडून आला नाही. उलट आम्हीच रामदास कदमांना आम्ही पाठिंबा देतोय म्हणून सांगा, अशी गळ घातली. मात्र पाठिंब्यासाठी शिवसेनेने प्रस्ताव दिला पाहिजे, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अखेरपर्यंत आम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार होतो. मात्र प्रस्ताव न आल्याने अखेरीस शेवटच्या दिवशी महापौर निवडीसंदर्भातील सर्वाधिकार आम्ही स्थानिक नेतृत्वाला दिले.’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा का दिला हे त्यांनाच विचारा,” असे सांगत मुख्यमंत्र्यांनी प्रश्न टोलवला. तसेच नगरमध्ये राष्ट्रवादी पाठिंबा दिला असला तरी पुढे असे काही होणार नाही. भाजपा पुढची निवडणूक १०० टक्के काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधातच लढणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.