आम आदमी पक्षातर्फे पंतप्रधान निवासस्थानावर मोर्चा; मोदींना केले लक्ष

0

नवी दिल्ली-दिल्लीत नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. आम आदमी पक्षाने आता नायब राज्यपालांऐवजी थेट पंतप्रधानांच निशाण्यावर घेण्याची रणनीती अवलंबली असून ते आज मंडी हाऊसपासून पंतप्रधान निवासस्थानावर मोर्चा घेऊन जात आहेत. दुपारी चार वाजता निघालेल्या या मोर्चात खासदार संजय सिंह, दिलीप पांडे आणि पक्षाचे इतर नेते आणि कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात सहभागी झाले आहेत.

आपने केंद्र सरकारच्या विरोधात आरपारच्या लढाईची घोषणा करत आता युद्धच होणार असल्याचे सांगितले आहे. पक्षाने आरोप केला आहे की, कार्यकर्त्यांना मंडी हाऊसला येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी जागोजागी बॅरिकेट लावले होते. पण कार्यकर्त्यांनी बॅरिकेटचा अडथळा दूर करत मंडी हाऊस गाठले. दुसरीकडे आपने या मोर्चासाठी परवानगी घेतली नसल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मागील आठवड्यापासून एलजी हाऊसमध्ये धरणे देत आहेत. दिल्लीतील अधिकारी संपावर असून यामुळे सरकारच्या कामकाजावर परिणाम झाल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. परंतु, दिल्लीतील आयएएस संघटनेने पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांच्या आरोपांचे खंडन केले असून सर्व विभागातील अधिकारी कामावर असल्याचा दावा केला आहे.