नवी दिल्ली : देशातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी अभियांत्रिकी शिक्षण संस्था असलेल्या इंडियन इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी)मधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील ‘संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) अॅडव्हान्स 2017’च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील पुण्याच्या अक्षय चुगने या परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत चंदिगडचा सर्वेश मेहतानी अव्वल आला असून दिल्लीच्या अनन्य अग्रवालला तिसरे स्थान मिळाले आहे.
21 मे रोजी ही घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी देशभरातील सुमारे एक लाख 70 हजार विद्यार्थी पात्र ठरले होते. देशातील 23 आयआयटीमधील सुमारे 11 हजार जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. जेईई अॅडव्हान्समधील कामगिरीच्या आधारावर विद्यार्थ्यांची आयआयटी आणि धनबादमधील माइन संस्थेसाठी निवड होणार आहे. जेईई अॅडव्हान्स परीक्षेत टॉप करणार्या सर्वेशने रुडकी विभागातून परीक्षा दिली होती. त्याला 366 गुणांपैकी 339 गुण मिळाले आहेत. जेईई मुख्य प्रवेश परीक्षेत तो 55 व्या स्थानावर होता, तर दुसर्या स्थानावर आलेला अक्षय चुग हा मुख्य प्रवेश परीक्षेत 7 व्या स्थानावर राहिला होता.
आयआयटीच्या पदवी कोर्सेससाठी संयुक्त प्रवेश (जेईई) अॅडव्हान्स परीक्षा घेतली जाते. जेईई अॅडव्हान्सचे दोन पेपर असतात. यावर्षी 81 टक्के मुलांनी तर 19 टक्के मुलींनी जेईई अॅडव्हान्स परीक्षा दिली. या परीक्षेत 500 परदेशी मुलांनीही सहभाग घेतला होता. आयआयटी मद्रास विद्यापीठाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर जेईई परीक्षेच्या निकालाची सविस्तर यादी जाहीर केली आहे.