नवी दिल्ली । आशिष दाहिया 2016 च्या बॅचचा आयएएस प्रशिक्षणार्थी असून तो हरियाणाच्या सोनीपतचा रहिवासी होता. स्विमिंग पूलमध्ये आपली सहकारी मैत्रिण बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला वाचवण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये उडी घेतलेल्या आयएएस अधिकार्याला आपल्या जीवाला मुकावं लागलं. दिल्लीच्या दक्षिण भागात परराष्ट्र सेवा संस्थेच्या स्विमिंग पूलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रिणीला वाचवण्यासाठी स्विमिंग पूलच्या खोल भागात उडी घेतलेल्या आयएएस अधिकार्याला तात्काळ फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचाराअंती त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. सध्या घडलेल्या प्रकाराची चौकशी सुरू आहे. आशिष दाहिया(30) असं मृत्यू झालेल्या अधिकार्याचं नाव आहे.
दिल्लीतील परराष्ट्र सेवा संस्थेच्या स्विमिंग पूलजवळ सोमवारी पार्टी सुरू असताना हा प्रकार घडला. आशिष त्याच्या आयएफएस आणि आयआरएस मित्र मंडळींसोबत पार्टी करत होता. त्यावेळी त्याची मैत्रिण तोल जाऊन स्विमिंग पूलमध्ये पडली. तिला वाचवण्यासाठी आशिष दाहियाने पूलमध्ये उडी घेतली. पूलच्या खोल भागात उडी घेतल्याने आशिषला पाण्याचा अंदाज आला नसावा. पोलिसांच्या माहितीनुसार पार्टीत त्यांनी मद्यपान केले होते. आशिषचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी एम्समध्ये पाठविण्यात आला असून त्याच्या कुटुंबीयांनाही कळविण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकार्यांकडून या प्रकरणाची चौकशी आणि प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेणं सुरू आहे. पुराव्यांचीही शोधाशोध सुरू असल्याची बातमी ‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिली आहे. घटनास्थळावर मिळालेल्या पुराव्यांनुसार दोघांनीही मद्यपान केल्याचे कळते. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार महिला प्रशिक्षणार्थीचा पाय घसरून ती स्विमिंग पूलमध्ये पडली. आशिषसह आणखी काही युवा अधिकार्यांनी तिला वाचवण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये उडी घेतली आणि तिला सुखरूप बाहेरही काढण्यात आलं. पण काही वेळानंतर आशिषचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला., अशी प्रतिक्रिया अतिरिक्त पोलीस उपायुक्त (दक्षिण) चिन्मॉय बिस्वाल यांनी दिली. आशिष दाहिया 2016 च्या बॅचचा आयएएस प्रशिक्षणार्थी असून तो हरियाणाच्या सोनीपतचा रहिवासी होता.