नवी दिल्ली। सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला आणखी एक झटका दिला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने इंडियन प्रीमिअर लीगमधील सामने प्रसारण करण्याच्या हक्काचा ई लिलाव का करत नाही, अशी बीसीसीआयकडे विचारणा केली आहे. यासंदर्भात भाजपचे ज्येेष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुठलेही कंत्राट देण्यासाठी ई लिलाव हा चांगला पर्याय आहे.
आयपीएलच्या प्रसरणाचे हक्काचा ई लिलाव का करत नाहीत अशी विचारणा स्वामी यांनी या याचिकेत केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने लिलाव प्रकियेवर निर्बंध न घालता पुढील सुनावणी 24 ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरवले आहे. आयपीएलच्या प्रसारण हक्क लिलावाची प्रक्रिया 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हे हक्क पाच वर्षांसाठी दिले जातील. न्यायमूर्ती दीपक मिश्रा प्रमुख असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बीसीसीआयला यासंदर्भात दोन आठवड्यांमध्ये आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.