आयपीएल बुकींग भोवली ; चोपड्यातील भाजपा पदाधिकारी घनशाम अग्रवाल यांना अटक

0

खालापूर पोलिसांची कारवाई ; पाच बड्या बुकींसह आठ आरोपींना अटक

भुसावळ- आयपीएल बुकी प्रकरणात चोपड्यातील भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी घनश्याम अग्रवाल यांना रायगडातील खालापूर पोलिसांनी शनिवारी सकाळी सात वाजता चोपड्यातून अटक केली. या कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पाच बड्या बुकींसह एक बँक मॅनेजर मिळून एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

बुकीच्या माहितीनंतर अग्रवालांना अटक
रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या चौक गावातील लिलाई हॉटेलमध्ये आयपीएलवर सट्टा बेटींग सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत एका बँक मॅनेजरसह पाच बुकींना तीन दिवसांपूर्वी अटक केली होती. आरोपींच्या ताब्यातून सव्वा लाखांची रोकडही जप्त करण्यात आली होती. पोलीस चौकशीत आरोपींचे पुण्यातील बुकीशी कनेक्शन आढळल्यानंतर विजय अग्रवाल या बुकीस अटक करण्यात आली तर त्याने घनश्याम अग्रवाल यांचे नाव बुकी म्हणून सांगितल्यानंतर व त्यांच्याकडे कटींग फिरवल्याची माहिती दिल्यानंतर अग्रवाल यांना शनिवारी सकाळी खालापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश शेलार व त्यांच्या पथकाने अटक केली. याबाबत चोपडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्याच्या वृत्ताला निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी दुजोरा दिला. भाजपाच्याच पदाधिकार्‍याला आयपीएल बुकी म्हणून अटक झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.