जळगाव : सध्या सुरू असलेल्या आयपीएल या स्पर्धेबाबत सट्टा घेणार्या तिघांना पोलिसांनी फातेमा नगरातून अटक केली आहे. आयपीएलच्या पंजाब विरुद्ध हैदराबाद या सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेताना रविवारी रात्री साडेसात वाजता ही कारवाई करण्यात आली. इम्रान अमीन खान (40, रा.चिखली, जि.बुलडाणा, ह.मु.फातेमा नगर), वसीम सैय्यद कामरोद्दीन (38) व जावेद नबी शेख (30, रा.फातेमा नगर) अशी संशयितांची नावे असून त्यांच्याकडून 40 हजार 600 रुपये रोख आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आले.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगावातील फातेमा नगरात आयपीएल मॅचेसवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाला मिळाली होती. रविवारी रात्री साडे सात वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किशोर पवार, चिंथा यांच्या कार्यालयातील मीनल साकळीकर, रवींद्र मोतीराया महेश महाले यांच्यासह एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी यांनी फातेमा नगरातील आयेशा किराणाजवळ छापा टाकला असता मोठ्या टीव्ही वर तसेच लॅपटॉपवर पंजाबविरुद्ध हैदराबाद या सामन्यावर तिघे जण सट्टा खेळताना आढळून आले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत साहित्य व रोकड हस्तगत केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक इम्रान सय्यद तपास करीत आहेत.