आयबीचे संचालक राजीव जैन यांनी घेतली अजित डोवाल यांची भेट

0

नवी दिल्ली-सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या निवासस्थानाबाहेर काल गुरुवारी आयबीच्या चार अधिकाऱ्यांना संशयित समजून ताब्यात घेण्यात आले. याप्रकारावरून गुप्तचर विभागामध्ये संतापाचे वातावरण आहे. आलोक वर्मा यांच्या निवासस्थानाबाहेरुन वर्मा यांच्या व्यक्तीगत सुरक्षारक्षकांनी आयबीच्या अधिकाऱ्यांना अक्षरक्ष गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली. आयबीमध्ये दिल्ली पोलिसांबद्दल संतापाची भावना आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयबीचे संचालक राजीव जैन यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेऊन नेमके काय घडले ते समजावून सांगितले.

यात दोन ज्युनियर आणि दोन सिनियर अधिकारी होते. देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने आयबीवर अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. या घटनेतून देशाच्या दोन सुरक्षा यंत्रणांमध्ये अजिबात ताळमेळ नसल्याचे अधोरेखित झाले. विशेष म्हणजे या दोन्ही यंत्रणा केंद्राच्या अखत्यारित आहेत. १९९१ साली दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निवासस्थानाबाहेरुन साध्या वेशातील दोन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी राजीव गांधींची हेरगिरी केली जात असल्याच्या संशयातून तत्कालिन पंतप्रधान चंद्रशेखर यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे सरकार कोसळले होते.