मुसळी फाट्याजवळील जिनिंगजवळ अपघात ः एकाच गावातील दोघां मित्रांच्या मृत्यूने शोककळा
जळगाव- नेहमीप्रमाणे जळगावाला नोकरीकामी दुचाकीवरुन येत असताना महामार्गावर मुसळी फाट्यावर रामजी जिनिंगजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारने दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर महामार्गावर पडलेल्या दुचाकीवरील दोघा भावांना समोरुन येणार्या आयशरने चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी 9.30 वाजता घडली. शोएब अली हारुन अली वय 22 व दाऊद शेख रियाजोद्दीन वय 21 दोघे रा.पिंपळकोठा ता.धरणगाव अशी दोघा मयत तरुणांची नावे आहेत. दोघे तरुण नातेवाईक असून शोएब हा दाऊदचा मामेभाऊ तर दाऊद हा शोएबचा आते भाऊ आहे. दोघांच्या एकाचेवेळच्या अकाली मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पिंपळकोठा येथील दाऊद शेख रियाजोद्दीन हा जळगावातील बी.जे.माकेंटमध्ये एका दुकानावर मोटार रिवायडिंगचे काम करत होता. तर गावातीलच त्याच्या घरासमोर राहणारा त्याचा मामाचा मुलगा शोएब हारुन अली हा पाळधी येथील इम्पेरीअल इंग्लिश मेडीयम या शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला आहे. दाऊदची दुचाकी असून नेहमी शोएब त्याच्यासोबत येतो. पाळधीला शोएब उतरला की, दाऊद जळगावला यायचा. शनिवारीही सकाळी दोघे नेहमीप्रमाणे दाऊदच्या दुचाकी (क्र. एम.एच.19 डी.जे.1342) वरुन जळगावकडे येण्यासाठी निघाले. यादरम्यान मुसळी फाट्याजवळ दुचाकीच्या मागे येत असलेल्या कारने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात दुचाकीला धडक बसली. कार पुढे निघून गेली यानंतर दुचाकीवरील दोघे महामार्गावर पडले अन् समोरुन येणार्या आयशरने चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. रामजी जिनींगच्या कर्मचार्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, दोघांकडील कागदपत्र, मोबाईलवरुन ते पिंपळकोठ्याचे असल्याची ओळख पटल्याने तेथे संपर्क साधण्यात आला. तसेच रुग्णवाहिकेतून दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. अपघातानंतर कार व आयशरचालक दोघे पसार झाले.
दोघे तरुण घरचे कर्ते पुरूष
दाऊदच्या पश्चात, आई संजीदाबी, लहान भाऊ शाहरुख व एक बहिण मुन्नी असा परिवार आहे. वडीलांच्या निधनानंतर कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची तसेच भावडांच्या शिक्षणाची जबाबदारी दाऊदवर होती. तो जळगावातील एका दुकानावर मोटार रिव्हाडींगचे काम करुन उदरनिर्वाह भागवित होतो. यातच दुर्देवी घटनेच त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबांचा आधार हिरावला आहे. तर दुसरीकडे शोएबच्या पश्चात आई, वडील दोन अविवाहित बहिणी, भाऊ अशफाक असा परिवार आहे. वडील वृध्द असल्याने शोएबवर कुटुंबाच्या उदनिर्वाहाची जबाबदारी होती. अशाप्रकारे दोघांच्या मृत्यूने पिंपळकोठा गाव सुन्न झाले आहे.