नवी दिल्ली । श्रीलंकेच्या दौर्यावर रवाना होण्यापूर्वी भारताचा भरवशाचा गोलंदाज रविचंद्रन अश्विनला श्रीलंकेच्या रंगना हेराथने जोरदार झटका दिला आहे. फिरकी गोलंदाज हेराथने अश्विनला मागे टाकत आयसीसीच्या कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजीत दुसर्या क्रमांकावर झेप घेतली. हेराथच्या कामगिरीमुळे अश्विनची तिसर्या स्थानावर घसरण झाली. हेराथने झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात 11 विकेट्स मिळवल्या होत्या. या कामगिरीचा फायदा हेराथला आयसीसीच्या क्रमवारीत मिळाला. भारताच्या रवींद्र जडेजाने मात्र या क्रमवारीत पहिले स्थान कायम राखले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत नऊ विकेट्स मिळवणारा झिम्बावेचा कर्णधार ग्रेग क्रेमरने 20 क्रमांकांनी मुसंडी मारताना 33 वे स्थान मिळवले. क्रेमरची ही आतापर्यंतंची सर्वोत्तम कामगिरी आहे. इंग्लंड आणि द. आफ्रिका यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्यात सात विकेट्स मिळवणारा वेगवान गोलंदाज अँडरसनला या यादीत फायदा मिळाला आहे. नवीन क्रमवारीत अँडरसन पाचव्या क्रमांकावर आला आहे.
कोहली 5 व्याच स्थानावर
फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने अव्वल स्थान कायम राखले आहे. याशिवाय भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि विराटा कोहली या क्रमवारीत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर कायम आहेत. लोकेश राहुलची एका क्रमांकाने घसरण झाली असून तो आता 10 व्या स्थानावर आहे. आफ्रिकेचा भरवशाचा फलंदाज हाशिम अमलाने फलंदाजांच्या टॉप टेनमध्ये प्रवेश केला. तो आता सातव्या क्रमांकावर आला आहे.