आयात-निर्यात क्षेत्राचा विस्तार होणे गरजेचे

0

महापौर मुक्ता टिळक यांचे मत

पुणे : इंटरनेटसारख्या सुविधांमुळे जगभरातील उद्योग क्षेत्र एकमेकांशी जोडले गेले आहे. मात्र, लॉजिस्टिक सारख्या गोष्टींबाबत सामान्य नागरिकांना फारशी माहिती नाही. आयात-निर्यात क्षेत्रात गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर सेवा देणे महत्त्वाचे आहे. तांत्रिकदृष्टया जग जवळ आले असून लॉजिस्टिक आणि आयात-निर्यातीच्या क्षेत्राचा आणखी विस्तार होणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे मत पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. ए.टी.सी. ग्लोबल लॉजिस्टिक तर्फे आयात-निर्यात याविषयावरील विनामूल्य राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन कोथरुड येथील हॉटेल गार्डन कोर्ट येथे करण्यात आले होते. यावेळी पुणे कस्टमचे सहआयुक्त रामा राव, नगरसेविका अ‍ॅड.गायत्री खडके, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्ष ॠतुजा जगताप, पी.सी. नांबियार, शंतनु भडकमकर, आशुतोष साठे आदी उपस्थित होते.

सुसंवाद गरजेचा आहे

रामा राव म्हणाले, प्रशासन वेगाने काम करीत आहे. त्यामुळे प्रशासनातील सुविधांचा लाभ प्रत्येकाने घ्यायला हवा. अनेक तरुण अधिकारी जादा वेळ काम करीत नागरिकांसह संस्थांना चांगल्या सुविधा देण्याकरीता प्रयत्नशील आहेत. मात्र, चांगल्या सुविधांकरीता नागरिक आणि संस्थांचा त्याबद्दलचा प्रतिसाद व प्रतिक्रिया कळणे गरजेचे आहे. प्रशासनाशी संवाद साधताना एखाद्या संस्थेला अडचण आल्यास त्याबाबत लगेच कार्यवाही होईल, परंतु त्याकरीता सुसंवाद गरजेचा आहे, असे सांगत ऑथोराईज्ड इकॉनॉमिक ऑपरेटर म्हणजेच ए.इ.ओ. याविषयावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला पुण्यासह, चाकण, रांजणगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर आदी भागांतून 300 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रिती परमार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेचा समारोप एस.पी.कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन व मनोगताने केला.