आयानमध्ये २ लाख ६० हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप

साखर कारखान्याचे संचालक एस. एस. सिनगारे यांची माहिती

नंदुरबार। तालुक्यातील समशेरपूर येथील आयान साखर कारखान्याने ४५ दिवसात २ लाख साठ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. कारखान्यांनी ऊसाला सर्वाधिक एकरकमी दर देण्याबरोबरच कमी वेळेत अधिक ऊसाचे गाळप करून शेतकर्‍यांना विश्वास दिला असल्याची माहिती कारखान्याचे संचालक एस. एस. सिनगारे यांनी दिली.
संचालक सिनगारे यांनी सांगितले की, समशेरपूर येथील आयान साखर कारखान्यात अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे ऊस गाळपाचा वेगही अधिक आहे. कारखाना उशिराने सुरू केला. मात्र, कमी वेळेमध्ये सर्व शेतकर्‍यांच्या ऊस गाळपास प्राधान्य देण्यात आले. ४५ दिवसात २ लाख ६० हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन २ हजार ४२५ रुपये असा दर दिला आहे. दहा वर्षाच्या तुलनेत हा सर्वाधिक दर आहे. सर्व पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात एकरकमी जमा केले जातात. नोंद आणि बिगर नोंद ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे. ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणा कार्यरत आहे. ही यंत्रणा शेवटपर्यंत कार्यरत राहील. संपूर्ण ऊसाचे गाळप होईपर्यंत पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू राहील.
शेतकर्‍यांचा कारखान्यावर विश्वास
येत्या ३० ते ४० दिवसात शिल्लक संपूर्ण ऊसाचे गाळप पूर्ण होईल. ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा कारखान्यावर विश्वास आहे. आगामी कालावधीत विश्वास कायम राहील. शेतकर्‍यांनी कोणत्याही चर्चा अथवा अफवांवर विश्वास न ठेवता आपला ऊस आयान साखर कारखान्यालाच द्यावा, असे आवाहन सिनगारे यांनी केले आहे.