साकेगाव येथील तक्रारदारांने केली विभागीय आयुक्तांकडे ग्रामसेवकाची तक्रार
भुसावळ- साकेगाव येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी एस.आर.चौधरी यांनी आपल्या सेवाकाळात केलेल्या अनागोंदी कारभाराबाबत दिपक चौधरी यांनी रोजगार हमी योजनेचे विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे तक्रार केली आहे.त्यानुसार आयुक्त कार्यालयाकडून जानेवारी महीन्यात जिल्हाधिकारी यांना व गटविकास अधिकारी यांना या प्रकरणी चौकशी करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेेत.मात्र सात महीन्याचा कालावधी होवूनही वरीष्ठांकडे चौकशीचा अहवाल सादर केला नसल्याने गटविकास अधिकारी यांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून येत आहे.
चौकशी न करताच सेवानिवृत्ती
साकेगाव येथील ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एस.आर.चौधरी यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून शासनाच्या नियम व अटीला वगळून गौण खनिज उत्खननचा नाहरकत दाखला दिला आहे.तसेच ग्रामपंचायतीच्या इतर अनागोंदी कारभाराबाबत दिपक बळवंत चौधरी यांनी रोजगार हमी योजनेचे विभागीय आयुक्त नाशिक, जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी,जिल्हाधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.त्यानुसार विभागीय आयुक्त नाशिक यांनी 23 ऑगष्ट 2017 व यानंतर 29 जानेवारी 2018 असे दोन वेळा जिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना तक्रारदाराच्या अर्जाची चौकशी करून अनुपालन अहवाल सादर केल्याचे पत्र दिले आहे.मात्र,दोन वेळा पत्र देवूनही गटविकास अधिकारी एस.बी.मावळे यांनी अद्यापपर्यंत चौकशी करून अनुपालन अहवाल वरीष्ठांकडे सादर केलेला नाही.यामूळे गटविकास अधिकार्यांनी वरीष्ठांच्या पत्राला केराची टोपली दाखवून चौकशी न करताच एस.आर.चौधरी यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आटोपला असल्याचे तक्रारदाराने सांगीतले.
नव्याने पुन्हा तक्रार दाखल
सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी एस.आर.चौधरी यांचे विरूद्ध केलेल्या तक्रारीची चौकशी न करताच त्यांना सेवाविृत्ती देण्यात आली.तसेच सेवानिवृत्तीनंतरही ग्रामविकास अधिकारी चौधरी यांची दिवसभर ग्रामपंचायतीच्या दप्तरामध्ये ढवळाढवळ सुरूच आहे.यामागचे गौडबंगाल काय असून गटविकास अधिकार्यांनी याबाबत चौकशी करावी असे नव्याने देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
सेवानिवृत्तीची रक्कम अदा करण्यात येवू नये
सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी एस.आर. चौधरी यांनी आपल्या सेवा कार्यकाळात केलेल्या गैरकारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी.तसेच चौकशी नंतरच त्यांच्या सेवानिवृत्तीची रक्कम अदा करण्यात यावी.अन्यथा गटविकास अधिकारी व प्रशासन चौधरी यांची पाठराखण करीत असल्याच्या विरोधात उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागेल, असे दिपक चौधरी यांनी सांगीतले.