आयुक्तांनी केली मार्केट व परिसरातील स्वच्छतेची पाहणी

0

नवी मुंबई । शहर स्वच्छतेवर विशेष भर देत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. शहरातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता विषयक कामांची पाहणी करीत आहेत. या अनुषंगाने कोपरखैरणे येथील सेक्टर 16 व सेक्टर 15 तसेच ऐरोली सेक्टर 3 व 5 येथील मार्केट व परिसराची आयुक्तांनी पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार, परिमंडळ 2 विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे, सहा. आयुक्त अशोक मढवी, तुषार बाबर, दत्तात्रय नागरे तसेच कार्यकारी अभियंता अनिल नेरपगार व संजय देसाई आदी अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. मार्केटची पाहणी करताना आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी त्याठिकाणी सारख्याच रंगाचे व आकाराचे फलक लावावेत अशा सूचना दिल्या. मार्केट परिसराची स्वच्छता राखणे ही तेथील विक्रेत्यांची नैतीक जबाबदारी असून त्यादृष्टीने त्यांनी त्यांची फेडरेशन तयार करून स्वच्छता कामांची व्यवस्था करावी असे त्यांनी सूचित केले. पूर्ण झालेली मार्केट गाळे वाटप करून त्वरीत सुरु करावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले.

मार्केटमध्ये ओला व सुका कचर्‍यासाठी स्वतंत्र कचरा पेट्या असाव्यात तसेच मार्केटमधील ओला कचरा व हरीत कचरा प्रक्रिया करून त्याचे खतात रुपांतर करण्यासाठी कंपोस्ट पिट्स तयार करण्याचेही त्यांनी संबंधितांस सूचित केले. ऐरोली दिवानगर वाणिज्य परिसराला भेट देऊन त्यांनी त्याठिकाणच्या स्वच्छतेत अधिक सुधारणा करण्याचे सूचित केले. तसेच त्याठिकाणचे पदपथ, रस्ते, मलनिस्सारण वाहिन्या यांची पाहणी करून आवश्यक कामांप्रमाणेच त्या विभागात छोट्या कचरा कुंड्याच्या संख्येत वाढ करण्याचेही त्यांनी सांगितले. ऐरोली येथील शाळेच्या स्वच्छता विषयक जनजागृतीपर प्रभात फेरीचाही आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शुभारंभ केला. स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश सर्व नवी मुंबईकर नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्याला असलेली स्वच्छता विषयक माहिती व स्वच्छतेविषयीची जाणीव आपल्या संपर्कातील प्रत्येकापर्यंत पोहचवली तर निश्‍चितच परस्पर संपर्कातून स्वच्छतेचे हे काम व्यापक स्वच्छता चळवळीचे रुप घेईल असा विश्‍वास महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केला असून या स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या कामात सर्वांनी कर्तव्य भावनेने सहभागी व्हावे असे आवाहन केलेले आहे.