आयुक्तांनी डासांच्या उपस्थितीत भाजीपाला ख÷रेदीचा आनंद लुटावा…!

0

राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आयुक्तांना निमंत्रण

सांगवी : सांगवी येथील पवना आणि मुळा नद्यांमध्ये जलपर्णीची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. या वाढत्या जलपर्णीमुळे सांगवीकर त्रस्त झाले आहेत. जलपर्णीमुळे सांगवी परिसरात डासांचे प्रमाण वाढत आहे. गेली दोन महिन्यांपासुन फोफावलेल्या जलपर्णीकडे आरोग्य विभागाने कानाडोळा केला आहे. वारंवार याची महापालिका प्रशासनाकडे तक्रार करुनही दखल घेतली जात व कारवाई केली जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका आयुक्तांना विशेष निमंत्रण दिले आहे. आयुक्तांनी संध्याकाळच्या वेळेत कुटुंबियांसोबत सांगवीत येऊन डासांच्या उपस्थितीत भाजीपाला खरेदीचा मनसोक्त आनंद लुटावा. तसेच यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी देखील उपस्थित रहावे, असे निमंत्रणाचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी
पालिकेला पाठविले आहे.

गटारांची कामे अर्धवटच राहिली
सांगवी-पिंपळेगुरव भागात नदीतील पाण्यात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. महापालिकेकडून मुळा आणि पवना नद्यांची साफसफाई होत नाही. त्याच बरोबर गटारांची कामे अर्धवटच राहिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अतुल शितोळे आणि राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत डास मारण्याची बॅट नुकतीच भेट देण्यात आली होती. परंतु, प्रशासनाने त्याचीदेखील दखल घेतली नाही.

भेट देऊन पाहणी करावी
त्यामुळे प्रशांत शितोळे यांनी आयुक्तांना पत्र पाठवून सायंकाळच्या वेळेत सांगवीत येऊन डासांच्या उपस्थितीत भाजीपाला खरेदी करण्याचे निमंत्रण दिले आहे. तसेच आपण स्वत: या परिसराला भेट देऊन पाहणी करावी असेही सुचविले. नागरीकांना डासांंमुळे घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. मागील आठवड्यात जलपर्णी काढण्याची मागणी करूनही ती पूर्ण होताना दिसत नाही. तर डासांपासुन नागरीकांच्या बचावासाठी धुरीकरण व औषध फवारणी नियमित होत नाही. त्यामुळे जलपर्णीपासून नागरिकांना होणारा त्रास आपल्या लक्षात येईल. सायंकाळी नागरिक रस्त्यावर फिरु शकत नाहीत. भाजी मंडई, दुकाने, पूल सर्वच ठिकाणी व्यापली आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना कराव्यात. धूर फवारणी, औषध फवारणी करण्यात यावी, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.