धुळे। मनपा आयुक्त श्रीमती संगिता धायगुडे यांच्या घरावर रात्रीच्या अंधारात दगडफेक करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या समाजकंटकांना शोधून काढून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी गुरूवारी लालबावटा मनपा कामगार युनियनने निषेध मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
युनियन आयुक्तांच्या पाठीशी
या निवेदनात म्हटले आहे की, आयुक्तांच्या घरावर 18 मे रोजी रात्री दगडफेक करण्यात आली. ही दगडफेक म्हणजे चांगल्या कामाला विरोध करण्याचा प्रकार असून अधिकार्यांवर दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. कामगार युनियन आयुक्तांच्या पाठीशी आहे. या हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि भविष्यात असले प्रकार होणार नाहीत यासाठी उपाय योजावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली
आहे.
कार्यकर्त्यांचा सहभाग
निषेधमोर्चा लालबावटा मनपा कामगार युनियनचे दिलीप वाघ, कॉ.हिरालाल सापे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. मोर्चात संतोष शिंदे, विलास हातागळे, हासिन मुस्ताक, दौलत देवरे, बापू अहिरे, किरण धर्मा, अंबादास थोटे या पदाधिकार्यांसह सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.