आयुक्तांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा

0

धुळे । धुळेकर जनतेला विविध नागरी सुविधा मिळाव्या यासाठी आंदोलन करणार्‍या ठराविक नगरसेवकांना सुडबुध्दीने आणि द्वेषातून भोगवटा प्रमाणपत्राच्या नोटीसा बजावून आयुक्त संगीता धायगुडे आमची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदरचे प्रमाणपत्र सादर न केल्यास नगरसेवक पद रद्द करण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच शासनाला कर वसुलीची खोटी आकडेवारी पाठवून पुरस्कार प्राप्त करुन घेत शासनाचीच फसवणूक करणार्या आयुक्त संगीता धायगुडे व धुळे मनापा प्रशासन यांच्याविरुध्द भादंवि कलम 420 अन्वये गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका प्रतिभाताई चौधरी यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

खड्ड्यांमध्ये बसून केले होते आंदोलन
भाजपच्या नगरसेविका प्रतिभाताई चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकप्रतिनिधींना लोकांच्या मुलभूत गरजेच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन, उपोषण, मोर्चा, ही आंदोलने अहिंसक मार्गाने करण्याचा भारतीय राज्य घटनेने दिलेला मुलभूत अधिकार आहे. परिसरातील नागरिकांनी दिनांक 11 मे रोजी धुळे महानगरपालिका प्रभाग क्र.7 मधील गरुड कॉलनी,एस.टी कॉलनी येथील गणपती पुलाची उतरती येथे रस्त्यांवर पडलेल्या तीन ते चार फुट खोल खड्ड्यांभोवती रांगोळीकाडून जनतेसाठी अहिंसक मार्गाने आंदोलन केले होते. तसेच त्याच दिवशी प्रभागातील पाण्याच्या समस्येकरीता मनपातील तीन नगरसेवक साबीर अली, अमीन पटेल, फातमा बी शेख गुलाब यांनी आंदोलन केले. यामुळे दुसर्याच दिवशी दिनांक 12 मे शुक्रवार रोजी आयुक्त संगीता धायगुडे यांच्या आदेशाने आंदोलन करणार्या आम्हा चार नगरसेवकांना सूडबुद्धीने व द्वेषभावनेने बांधकाम व भोगवटा पत्राची नोटीस देवून नगरसेवक पद रद्द करण्याची धमकी देण्यात आली आहे.

शासनाला भासवली 92 टक्के वसुली
आयुक्त धायगुडे यांच्या म्हणण्यानुसार शहरात 92% कर वसुली झाली आहे. यावर त्यांनी शासनाकडून मुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार ही प्राप्त करून घेतला आहे. महाराष्ट्र शासनाला अंधारात ठेवून प्रत्यक्षात धुळे मनपाची कररूप वसुली फक्त 60% असताना शासनाला सदर वसुली 92% भासवून आयुक्त धायगुडे यांनी शासनाची गंभीर फसवणूक केल्या प्रकरणी आणि खोटा पुरस्कार मुख्यमंत्री यांच्या कडून प्राप्त करून घेतल्यामुळे आयुक्त धायगुडे यांच्यावर तत्काळ फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.