प्रशासकीय पातळीवर कार्यवाही संथगतीने
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासाठी होणार्या स्वतंत्र नवीन पोलिस आयुक्तालयासाठी चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारत योग्य असल्याचे, पोलिसांनी महापालिकेले कळविले आहे. तथापि, शाळेची जागा पोलिस आयुक्तलयास देण्यास विरोध वाढू लागला आहे. नागरी हक्क सुरक्षा समितीनंतर आता पालकांनी देखील विरोध दर्शविला आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तालय सुरु होण्यास विलंब होत आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तलायासाठी काढलेला महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त हुकणार असून आता आयुक्तालयाच्या शुभारंभासाठी कुठला मुहूर्त साधला जातोय, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला मंत्रीमंडळाच्या 10 एप्रिल 2018 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण चार हजार 840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलिस आयुक्तालय आणि पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण कडून दोन हजार 207 पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित दोन हजार 633 पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत. नव्याने भरती करावयाची पदे तीन टप्प्यात भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 60 टक्के, त्यानंतर दोन वर्षांनी दुसर्या टप्प्यात 20 टक्के आणि त्यानंतर दोन वर्षांनी तिसर्या टप्प्यात 20 टक्के पदे भरली जाणार आहेत.
जागेचा शोध सुरू
एवढा मोठा डोलारा सांभाळण्यासाठी प्रशस्त जागेची आवश्यकता आहे. पोलिस आयुक्तलायाची घोषणा झाल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून शहरातील विविध जागांचा शोध घेणे सुरु झाले. याकरिता संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील तंत्र शिक्षण संस्थेजवळील मोकळी जागा, फ क्षेत्रीय कार्यालय, आकुर्डी प्राधिकरणातील हेडगेवार भवन आणि चिंचवड येथील प्रेमलोक पार्कमधील महापालिका शाळेच्या जागेची पाहणी करण्यात आली होती. पोलिस प्रशासनाने चिंचवड येथील प्रेमलोक पार्कमधील महापालिका शाळेची जागा आयुक्तालयासाठी योग्य असल्याचे, पालिकेला कळविले.
पालकांचा विरोध
ही इमारत किती दिवसात उपलब्ध होऊ शकते, इमारतीचा शासकीय भाड्याचा दर काय राहील, ही इमारत आवश्यक फर्निचरसह उपलब्ध होऊ शकेल काय, याबाबतची माहिती पालिका प्रशासनाकडून पोलिसांनी 21 एप्रिल रोजी मागविली होती. परंतु, पोलिसांचे हे पत्र अद्याप महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाकडे प्राप्त झाले नाही. त्याचबरोबर शाळेची जागा पोलिस आयुक्तालयाला देण्यास विरोध वाढू लागला आहे. नागरी हक्क सुरक्षा समितीनंतर आता पालकांनी देखील विरोध दर्शविला आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तालय सुरु होण्यास विलंब होत आहे.
पोलिस आयुक्तालय सुरु करण्यासाठी प्रशस्त कार्यालय लागणार आहे. पोलिस आयुक्त, सहआयुक्तपांसून वरिष्ठ अधिकार्यांना स्वतंत्र कार्यालयाची आवश्यकता आहे. संगणकासह विविध सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तलाय सुरु होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तलायासाठी काढलेला महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त हुकणार असून आता आयुक्तालयाच्या शुभारंभासाठी कुठला मुहूर्त साधला जातोय, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.